🌟६५ वर्षावरील सभासदांना मिळणार १० हजार रुपयांचा सन्मान निधी🌟
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यातील ॲटो रिक्षा व टॅक्सी चालकांना दिलासा देणारी महत्वपूर्ण घोषणा केली असून आता धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटोरिक्षा, मीटर टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळामार्फत राज्यातील रिक्षा, टॅक्सीचालकांना विविध लाभदेण्यात येणार आहेत. मंडळाच्या ६५ वर्षांवरील सभासद चालकांना निवृत्ती सन्मान योजनेंतर्गत विशिष्ट दिनानिमित्त १० हजार रुपये सन्मान निधी दिला जाणार आहे. त्यासाठी रिक्षा, टॅक्सीचालकांना आवश्यक अटी, शर्ती पूर्ण कराव्या लागणार आहेत. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवार दि.१३ फेब्रुवारी २०२५ रोजी याबाबतची घोषणा केली.
रिक्षा व मीटर टॅक्सीचालकांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ पुरविण्याच्या उद्देशाने धर्मवीर आनंद दिघेसाहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या कल्याणकारी महामंडळाची पहिली बैठक गुरुवारी झाली. या बैठकीनंतर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा, टॅक्सीचालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली. ते म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना या मंडळाच्या माध्यमातून लाखो चालकांसाठी राबविण्यात येतील.
यामध्ये राज्यभरातील सर्व रिक्षा व मीटर टॅक्सीचालकांना ५०० रुपये नोंदणी शुल्क व ३०० रुपये वार्षिक वर्गणी भरून या मंडळाचे सदस्यत्व घेता येईल. मंडळाच्या सभासद नोंदणीसाठी संकेतस्थळ निर्माण करण्यात आले असून या संकेतस्थळावरून चालकांना सभासद नोंदणी करता येणार आहे. तसेच ६५ वर्षांवरील सभासद चालकांना निवृत्ती सन्मान योजनेंतर्गत प्रत्येकी १० हजार रुपये सन्मान निधी दिला जाणार आहे. त्यासाठी चालकांना विविध अटी, शर्ती पूर्ण कराव्या लागणार आहेत.
🛺मंडळाकडून सभासद चालकांसाठी विविध योजना🚕
तसेच सभासद चालकांसाठी जीवन विमा, अपंग विमा अशा आरोग्य योजना राबविणे विचाराधीन आहेत. तसेच त्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजनादेखील राबवली जाणार आहे. तसेच कर्तव्यावर असताना एखाद्या चालकास दुखापत झाल्यास त्याला या कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाणार आहे, तर उत्कृष्ट रिक्षा-टॅक्सीचालक, उत्कृष्ट रिक्षा/टॅक्सीचालक संघटना तसेच उत्कृष्ट रिक्षा स्टॅन्ड यांच्यासाठी आकर्षक बक्षीस योजना दरवर्षी राबवली जाईल, असे सरनाईक यांनी सांगितले....
0 टिप्पण्या