🌟शिवजयंती : उत्सव मराठी मातीचा,उत्सव निधड्या छातीचा..महोत्सव मानव जातीचा🌟
वृत्तदर्पण..✍️ राजेंद्र काळे
छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बुलढाणा
▪️शिवजयंती सोहळा : अदभूत तेवढाच अविस्मरणीय...शिवजयंती : उत्सव मराठी मातीचा,उत्सव निधड्या छातीचा..महोत्सव मानव जातीचा ! या व्यापक भूमिकेतून महाराष्ट्रातील सर्वातमोठा शिवोत्सव सुरु झाला मातृतिर्थ जिल्हा मुख्यालयी बुलढाण्यात, १४ फेब्रुवारीलाच. शिवजयंती केवळ १९ फेब्रुवारी या एकाच दिवशी साजरी न करता, छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाण्याच्या वतीने आयोजीत करण्यात आला होता यावर्षी सांस्कृतिक व प्रबोधनात्मक.. शिवसप्ताह!
शिवसप्ताहाचा शिवारंभ शिवकिर्तनाने झाला,निवृत्ती महाराज इंदोरीकरांच्या कीर्तनात उसळला होता शिवसागर. छत्रपती शिवाजी महाराज सर्वश्रेष्ठ का? तर त्यांनी सत्कर्मालाच देव मानले.. हा सत्कार्याचा संदेश त्यांनी दिला. १५ फेब्रुवारीपासून सुरु झाल्या सांस्कृतिक स्पर्धा. पहिला दिवस चिमुकल्यांच्या पोवाड्यांनी गाजवला, दुसर्या दिवस एैतिहासीक वेशभुषांनी तर तिसरा दिवस वर्क्तृत्व स्पर्धांनी.यात जिल्हाभरातून २१५ शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले होते. १६ फेब्रुवारीला वाजली अन् गाजली ‘शिवशंभो गर्जना’ अभि-अमूच्या लाईव्ह कॉन्सर्ट शो मध्ये आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी तालावर धरलेला ठेका, महाराष्ट्रभर तुफान व्हायरल झाला. १७ फेब्रुवारीला ‘महाराजांची आग्र्यावरुन सुटका’ या ज्वलंत विषयावर प्रशांत देशमुख यांचे शिवव्याख्यान चिंतनगर्र्भ ठरले. महाराजांची सुटका बुध्दीचातुर्याने झाली, हा संदेश त्यांनी दिला. १८ फेब्रुवारीला सकाळी ‘छत्रपती शिवराय व आजचा युवक’ विषयावर प्रा.विठ्ठल कांगणे सरांचे प्रेरणादायी व्याख्यान युवक-युवतींमध्ये चैतन्य निर्माण करणारे ठरले. तर सायंकाळी युवाशाहीर विक्रांतसिंह राजपूत यांचा ‘महाराष्ट्राचा शाहिरीबाणा’ अगदी तुफान झाला..सर्वच कार्यक्रम हाऊसफुल!
छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणाला यावर्षी तयारीसाठी खूपच कमी कालावधी मिळाला. ५ फेब्रुवारीपर्यंत तर कार्यक्रमही न ठरल्याने पत्रिकाही छापल्या गेल्या नव्हत्या. ६ फेब्रुवारीला पत्रिका आली, अन् १४ फेब्रुवारीपासून धुमधडाक्यात कार्यक्रम सुरु झाले. यावर्षी प्रथमच संपर्कासाठी कार्यालय उघडण्यात आले, ‘शिवसंपर्क’ या नावाने शिवस्मारकाच्या मागील बाजूस. या कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री मकरंद आंबांनी केले होते, यावेळी आ.संजय गायकवाड व आ.मनोज कांयदे यांची उपस्थिती होती. नंतर या कार्यालयाला केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव यांनी भेट दिली होती.
शिवसप्ताहात कामगार मंत्री ना.आकाश फुंडकर, आ.संजय कुटे, आ.मनोज कायंदे, आ.सिध्दार्थ खरात, रविकांत तुपकर यांचेसह मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विद्याधर महाले यांनी सोहळ्याला भेटी देवून मनोगते मांडली. शेवटच्या दिवशी केंद्रीयमंत्री ना.प्रतापराव जाधव, जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधिक्षक विश्व पानसरे, जि.प.सीईओ.गुलाबराव खरात यांचेसह प्रशासकीय अधिकारी तर सर्वच कार्यक्रमांना आ.संजय गायकवाड यांनी पूर्णवेळ उपस्थिती..हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले. तर माजी आमदार विजयराज शिंदे, भाजपा नेते योगेंद्र गोडे, डी.एस.लहाने, नेत्रतज्ञ वसंतराव चिंचोले, डॉ.अशोकराव खरात, बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर, मृत्युंजय गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते डी.एस. लहाने, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, ॲड. अजय दिनोदे, सौ.पूजाताई गायकवाड, सौ. मालतीताई शेळके यांच्यासह अनेक मान्यवर शिवमंचावर येऊन गेले.. खूप शिवभक्त नेते मंडळी येऊन गेली, नावे सुटू शकतात !
यावर्षी पत्रिकेत कुणाचेही नाव नव्हते, अगदी जयंती सोहळ्याच्या अध्यक्ष व सचिवांचेसुध्दा. तरीही ज्यांची नावे राज्यात व देशात गाजलीत अशा जिल्ह्यातील सर्वच मान्यवरांनी या शिवसप्ताहाला भेटी दिल्यात. दरम्यानच्या काळात शिववाहतूक सेनेतर्फे कार्यक्रमस्थळी व याच ठिकाणी शेवटच्या दिवशी सामान्य रुग्णालयातर्फे रक्तदान शिबिरे झालीत, जिल्हाधिकार्यांसह जवळपास २०० शिवभक्तांनी रक्तदान केले. शिवकालीन नाणे प्रदर्शनी तथा छायाचित्र प्रदर्शनी लक्षवेधी ठरली.. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवज्योत, दिपोत्सव, आरंभला मध्यरात्री फटाक्यांची आतषबाजी.
सुर्योदयासमयी पहाटेच छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात महापूजा, टाळ-मृदंगाच्या निनादात अन् शिवशाही थाटात सकाळचा पालखी सोहळा..नंतर ‘जय शिवाजी, जय भारत’ या प्रशासकीय रॅलीत समितीचा सहभाग बुलढाणा शहर शिवमय करुन गेला. कार्यक्रमास्थळाला ‘शिवनेरी’ नाव होते, या शिवनेरीवर बाळ शिवबाचा पाळणा हलला. तत्पूर्वी सुरु होती शाहीर डी.आर.इंगळे व चमुची शिवपहाट, नंतर माजी सैनिकांच्या दोन्ही तुकड्यांनी दिलेली सलामी, पोलिस बॅण्डकडून राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत, मिलीटरी स्कूल व स्काऊट विद्यार्थ्यांचे पथसंचलन. सांस्कृतिक कार्यक्रम, शिवयोग..बरंच काही काही. शिवजयंतीचा दिवसच होता, शिवमय !
सायंकाळी शिवस्मारकावरुन शोभायात्रा सुरु झाली. शिवजयंती डिजेमुक्त करण्याचा निर्धार समितीने केल्यानंतर प्रथमच परिवारासह नागरिक मिरवणुकीत सहभागी झाले. जणु अख्खे बुलढाणा शहरच शिवरायांना अभिवादन करण्यासाठी रस्त्यावर उतरलेले दिसत होते. इतक्या भव्य गर्दीतही शिवप्रेमी स्वयंशिस्त पाळत होते, कुठेही पोलिसांना हस्तक्षेप करण्याची गरज पडली नाही. या मिरवणुकीत कोणालाही लोट-पाट व धक्काबुक्की झाली नाही. कोणाचे सोने, मोबाईल तर सोडाच परंतु शिवस्मारकापुढे काढलेल्या चपलाही चोरी गेल्या नाही. या शोभायात्रेत ढोल-ताशा, डमरु, झांज अन् भजनी मंडळाचा मंजुळ आवाज दुमदुमत होता. डिजेमुक्त वातावरणामुळे ध्वनी प्रदुषणाला आळा बसल्याचे दिसले. सायंकाळी ५ वाजता सुरु झालेली मिरवणूक, मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वेळ असतांनाही रात्री १० वाजताच संपवण्यात आली. त्याठिकाणी समिती पदाधिकार्यांच्या हस्ते अरविंद होंडे व मित्र मंडळाने बंदोबस्तात सहभागी पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी व होमगार्डस यांचे स्वागत केले. एकूणच, छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणाची २०२५ ची शिवजयंती महाराष्ट्रासाठी दिशादर्शक तर ठरलीच, पण अद्भूत तेवढाच अस्विमरणीय ठरला.. शिवजयंती सोहळा!
✍️ राजेंद्र काळे
0 टिप्पण्या