🌟नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी रामलीला मैदानावर झालेल्या शपथगृहण सोहळ्यात पद व गोपनियतेची शपथ दिली🌟
नवी दिल्ली : भारत देशाची राजधानी असलेल्या दिल्ली या केंद्रशासीत प्रदेशच्या मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाच्या रेखा गुप्ता यांच्यासह सहा कॅबिनेट मंत्र्यांना आज गुरुवार दि.२० फेब्रुवारी रोजी दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी रामलीला मैदानावर झालेल्या भव्य शपथगृहण सोहळ्यात पद व गोपनियतेची शपथ दिली.
नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्षाचा दारुण पराभव करुन भाजपने २७ वर्षानंतर स्पष्ट बहुमत मिळविले होते. गेली काही दिवस दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता निर्माण झाली होती. काल भाजप विधीमंडळ पक्षाच्या झालेल्या बैठकीत रेखा गुप्ता यांचे मुख्यमंत्रीपदासाठी नाव निश्चित झाले होते. तत्पूर्वीच शपथविधी सोहळ्याची तारीख भाजपच्यावतीने जाहीर करण्यात आली होती. रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपप्रणित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, केंद्रातील मंत्र्यांची यावेळी उपस्थिती होती. या सोहळ्यात रेखा गुप्ता यांच्यासह सहा जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. रेखा गुप्ता यांच्यानंतर प्रवेश वर्मा, आशिष सूद, मनजिंदर सिंग सिरसा, रविंद्र इंद्रराज, कपिल मिश्रा आणि पंकज सिंह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर प्रत्येकाच्या मंत्रिपदाचा निर्णय घेतला जाईल. भाजपने आपल्या मंत्रिमंडळाच्या घोषणेने जाती आणि समुदायांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये जाट, पंजाबी आणि पूर्वांचल या सर्वांची काळजी घेण्यात आली आहे......
0 टिप्पण्या