🌟राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर १६१ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप....!

 


🌟अंजली दमानियांचे आरोप धादांत खोटे :  मंत्री ना.धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर

मुंबई :- राज्याचे कृषी मंत्री असतांना विद्यमान अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी १६१.६८ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा सनसनाटी आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज मंगळवार दि.०४ फेब्रुवारी रोजी मुंबईत एका भरगच्च पत्रकार परिषदेत केला या आरोपानंतर लगेचच अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी दमानियांचे आरोप धांदात खोटे असून सनसनाटी निर्माण करण्यासाठी आरोप केले गेले असल्याचे प्रत्युत्तर दिले आहे.

बिड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रुर हत्येनंतर सातत्याने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. सुरुवातीला धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे कौटुंबिक व व्यावसायीक संबंध असल्यामुळे मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांसह अंजली दमानिया यांनी केली होती.अंजली दमानिया यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी मागच्या सरकारमध्ये कृषी मंत्री असतांना धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत (डीबीटी) ऐवजी शेती आवश्यक साहित्य पुरवण्याचा निर्णय घेतला. हे साहित्य बाजारभावापेक्षा जादा दराने खरेदी करुन १६१.६८ कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचे पुरावे पत्रकारांसमोर सादर केले. 

या पत्रकार परिषदेनंतर लगेचच ना. धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत अंजली दमानिया यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करणं आणि धादांत खोटं बोलणं याव्यतिरिक्त काही नाही असा दावा मुंडे यांनी केला आहे. मार्च २०२४ मध्ये राबवण्यात आलेली निविदा प्रक्रिया ज्यावर आक्षेप घेतला ती संपूर्णपणे नियमात आणि शासनाच्या धोरणाला साजेशी होती असंही त्यांनी सांगितलं आहे. मागच्या ५० दिवसांपासून वेगवेगळे आरोप केले जात आहेत. पण त्यातील एकही आरोप सिद्ध झालेला नाही. डीबीटीमध्ये काय असावं आणि काय नसावं, कोणतीही बाब वगळण्याची, समाविष्ट करण्याचे अधिकार कृषिमंत्री, मुख्यमत्री यांचे आहेत. याच कार्यपद्धतीचा अवलंब केला आहे. मुख्यमंत्र्यांसमोर सादर करुन मान्यतेने प्रक्रिया अंतिम केली असल्याचा दावा मुंडे यांनी यावेळी केला. एप्रिल, मे महिन्यात लोकसभेची आचारसंहिता आणि जूनमध्ये सुरु होणारा खरिप हंगाम लक्षात घेऊन लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सदर खरेदी प्रक्रिया मार्च महिन्यात करण्यात आली. शेतऱ्याला पेरणीच्या आधी कोणत्या गोष्टी लागतात, फवारणी कधी करायची, तण कधी काढायचे हे त्यांना माहिती नसावं, असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. पुढे ते म्हणाले की, नॅनो खतासंदर्भात आरोप करण्यात आला. नॅनो खताच्या वापराबाबत सर्वात जास्त प्रोत्साहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. या देशात नरेंद्र मोदींनी प्रोत्साहन दिले होते. यानंतर राज्य सरकारने देशात सर्वप्रथम ४ लाख शेतकऱ्यांना नॅनो दिला महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे ज्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नॅनो वाटप केल्याचा दावा मुंडे यांनी यावेळी बोलतांना केला......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या