🌟नवमतदार नोंदणीची माहिती देण्यासाठी निवडणूक आयोगाकडून टाळाटाळ🌟
नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्यातील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनला दणदणीत यश मिळाल्यानंतर अवघ्या काही दिवसांच्या कालावधीत झालेल्या विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचा पराभव हा नवमतदार नोंदणीमुळेच झाला नवमतदार नोंदणीची माहिती देण्यासाठी निवडणूक आयोगाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा गंभीर आरोप इंडिया आघाडीच्यावतीने आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी लोकसभेत केला होता. या संदर्भात आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभेतील खा. संजय राऊत यांनी दिल्लीत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांबाबत सविस्तर आकडेवारी देऊन तीन महत्त्वाचे प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले आहेत. यात ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त बदलण्याची प्रक्रियाच बदलल्याचा मुद्दा उपस्थित केला. सरन्यायाधीश, विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधान यांच्या समितीकडून निवडणूक आयुक्त नेमला जातो. या समितीतून सरन्यायाधीशांना बाहेर काढण्यात आले. त्यांच्या जागी एका भाजपा व्यक्तीला त्या समितीत घेण्यात आले. ऐन लोकसभा निवडणुकीच्या आधी निवडणूक आयुक्तांना हटवण्यात आलं आणि नव्या आयुक्तांना तिथे नेमण्यात आलं, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने गैरप्रकार केला. नुकत्याच झालेल्या लोकसभा ते विधानसभा २०२४ या पाच महिन्यांत ३९ लाख नवे मतदार समाविष्ट झाले. हे ३९ लाख मतदार कोण आहेत ? आख्ख्या हिमाचल प्रदेशमध्ये ३९ लाख मतदार आहेत. आणि तेवढे नवे मतदार महाराष्ट्रात मतदार याद्यांमध्या समाविष्ट झाले आहेत, असा मुद्दा राहुल गांधींनी उपस्थित केला. सरकारच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ९.५४ कोटी आहे. पण निवडणूक आयोगानुसार महाराष्ट्रात त्याहून जास्त म्हणजे ९.७ कोटी मतदार आहेत. लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अचानक हे मतदार तयार करण्यात आले आहेत, असा दावा राहुल गांधींनी केला. महाराष्ट्रात विरोधी पक्षांना जितक्या मतदारांनी मतदान केलं त्यांची संख्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान अजिबात कमी झालेली नाही. भाजपाला लोकसभेत १.९ लाख मतं मिळाली होती. विधानसभेत त्यांना १.७५ लाख मतं मिळाली. यातले बहुतेक मतदार हे त्या नव्याने समाविष्ट झालेल्या ३५ हजार मतदारांमधून आले. हे फक्त एका मतदारसंघातलं नाहीये. हे अनेक मतदारसंघांमध्ये दिसतंय. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी मतदारसंघांमध्ये हे दिसून आलं आहे, असा आरोपही खा. गांधींनी केला आहे......
0 टिप्पण्या