🌟'मला बाबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे' ; बारावीचा पहिला पेपर दिल्यावर स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख भावुक....!


🌟वैभवी देशमुख हिने सर्व दु:ख बाजूला सारून बारावीचा पहिला पेपर दिला🌟                                          

✍️ मोहन चौकेकर 

ही अशी पहिली परीक्षा आहे,जेव्हा बाबा माझ्यासोबत नव्हते आधी बारावीची परीक्षा देण्याची माझी मानसिकताच नव्हती प्रत्येक क्षण वडिलांची आठवण येते. बाबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे त्यासाठी बारावीची परीक्षा देण्याची तयारी केली. मला काहीतरी करून दाखवायचे आहे. त्यामुळे सर्व दु:ख बाजूला सारून बारावीचा पहिला पेपर दिला आणि मानसिकता नसली तरी यापुढील सर्व पेपर चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करणार आहे, असे मृत संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख यांनी म्हटले आहे. 

जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत लढत राहणार अशी ठाम भूमिका वैभवी देशमुख यांनी घेतली आहे. एकीकडे वडिलांची झालेली हत्या, न्याय मिळण्यासाठी करावा लागणारा मोठा संघर्ष आणि बारावीच्या परीक्षेचा एक महत्त्वाचा टप्पा या तारेवरची कसरत करून वैभवी देशमुख बारावीच्या परीक्षेला सामोऱ्या जात आहेत. राज्यात बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. पहिला पेपर दिल्यानंतर काही माध्यमांनी वैभवी देशमुख यांच्याशी संपर्क साधून प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यावेळी अतिशय भावुक होत वैभवी देशमुख यांनी यावर भाष्य केले.

💫या परीक्षेला बाबा सोबत नाहीत हे माझे दुर्भाग्य आहे :-

वडील आमच्यात नाहीत, ही खूप दुःखाची गोष्ट आहे. यातून आम्ही अजूनही सावरू शकलेलो नाही. वडील असते तर परीक्षा केंद्रावर आले असते. माझ्यासाठी पेपर होईपर्यंत थांबले असते. परंतु, या परीक्षेला बाबा सोबत नाहीत, हे माझे दुर्भाग्य आहे. ते आमच्यासोबत असते तर आम्ही खचून गेले नसतो. इतका संघर्ष कधीही करावा लागला नसता. कारण असे दुःख आम्ही कधीच पाहिले नाही. 

दरम्यान, बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून एकजण अद्याप फरार आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलने केली आहेत. या प्रकणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर लावून धरली आहे. यावरून दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. न्याय मिळायला हवा, यासाठी देशमुख कुटुंबाचा संघर्ष सुरू आहे. भगवान गडावर जाऊनही वैभवी देशमुख यांनी महाराजांसमोर स्पष्ट शब्दांत गाऱ्हाणे मांडले होते......

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या