🌟महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने सुनावली ५० हजारांच्या दंडाससह २ वर्षांची शिक्षा...!

 


 🌟या निर्णयाविरुध्द वरीष्ठ न्यायालयात दाद मागणार असल्याचे माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले🌟

मुंबई (दि.२० फेब्रुवारी २०२५) - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तथा राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधु सुनील कोकाटे यांना शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्षाचा कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर ना. कोकाटे यांचे मंत्रीपद आणि आमदारकीवर टांगती तलवार आली आहे. याप्रकरणी आपण जामिनासाठी अर्ज केला आहे. त्याचप्रमाणे या निर्णयाविरुध्द वरीष्ठ न्यायालयात दाद मागणार असल्याचे माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले आहे.

राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह चार जणांविरुध्द ३० वर्षांपूर्वी खोटी माहिती देवून मुख्यमंत्री कोट्यातील घर घेतल्या प्रकरणी तत्कालिन मंत्री तुकाराम दिघोळे यांनी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेचा निकाल आज लागला आहे. न्यायालयाने राज्याचे कृषी मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधु सुनील कोकाटे यांना दोन वर्ष कारावास आणि ५० हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, १९९५ ते १९९७च्या दरम्यानचे हे प्रकरण आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी राज्य शासनाकडून मुख्यमंत्री कोट्यातून मिळणाऱ्या सदनिका घेतल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आपले उत्पन्न कमी असल्याचे दर्शविले होते. त्याचसोबत आपल्या नावावर कुठलेही घर नसल्याचे शपथपत्र त्यांनी शासनाला सादर केले होते. त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केलेली होती.

१९९५ साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप तत्कालिन मंत्री तुकाराम दिघोळे यांनी केला होता. याच प्रकरणी नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. हे प्रकरण १९९७ पासून न्यायप्रविष्ठ होते. याप्रकरणी आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने आपला निकाल सुनावला आहे. या प्रकरणात माणिकराव कोकाटे, त्यांचे बंधूंसह इतर दोन अशा चौघां विरुद्ध न्यायालयात प्रकरण सुरु होते. या प्रकरणी न्यायालयाने कोकाटे बंधूंना शिक्षा ठोठावली मात्र इतर दोन जणांना केवळ दोषी ठरविले आहे. लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचे सभागृहाचे सदस्यत्त्व रद्द होते. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते. गेल्या काही दिवसांपासून माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या नेत्याच्या मंत्रिपदावर गंडांतर ओढावले आहे. त्यामुळे आता याप्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय पावले उचलणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या