🌟नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा बोर्ड कर्मचार्‍यांच्या प्रमोशनसाठी चार सदस्यीय समिती स्थापन....!


🪯बाबा फत्तेहसिंघजी बहुउद्देशीय संस्था व सिख समाज बांधवांकडून आयोजित शुक्रवारचे आंदोलन स्थगित🪯 

🪯संस्थापक अध्यक्ष मनबीरसिंघ ग्रंथी यांची माहिती🪯


नांदेड (दि.१३ फेब्रुवारी २०२५) :- नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या कर्मचार्‍यांचे प्रमोशन व अन्य प्रश्नांसाठी, गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ.विजय सतबिरसिंघ यांच्या आदेशानुसार गुरुवारी दि.13 रोजी चार सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे त्यामुळे कर्मचार्‍यांच्या वरिल प्रश्नांसाठी शुक्रवार दि.14 रोजी गुरुद्वारा गेट नं.1 येथे होणारे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. बाबा फत्तेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मनबीरसिंघ ग्रंथी यांनी गुरुवारी सायंकाळी बैठकीनंतर ही माहिती दिली. 


येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डामध्ये प्रशासक डॉ.विजय सतबिरसिंघजी यांनी नुकतीच काही मोजक्या कर्मचार्‍यांना पदोन्नती दिली होती. त्यामुळे त्यांच्या प्रमाणेच काम करणार्‍या अन्य कर्मचार्‍यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. कारण मोजक्या कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्यामध्ये प्रशासकांनी पक्षपात केला असा आरोप तेवढ्याच सिनइर असलेल्या कर्मचार्‍यांनी केला होता. तेव्हा सर्व कर्मचार्‍यांची सेवाज्येष्ठता, त्यांची शैक्षणिक पात्रता आदी बाबी लक्षात घेवून काही मोजक्याच नव्हे तर सर्व कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्यात यावी अशी मागणी बाबा फत्तेहसिंघजी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मनबिरसिंघ ग्रंथी व त्यांच्या सहकार्‍यांनी खुद्द प्रशासक डॉ.विजय सतबीरसिंघ यांच्याकडे केली होती.

याच मागणीसाठी शुक्रवार दि.14 रोजी गुरुद्वारा गेट नं.1 येथे शिख समाज व संस्थेच्यावतीने धरणे आंदोलन करण्याचा इशारा ग्रंथी व इतरांनी दिला होता. त्यांच्या या मागणीची व इशार्‍याची दखल घेवून, सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे अधिक्षक यांनी संस्थेच्या शिष्टमंडळास आज गुरुवारी दुपारी चर्चेसाठी आमंत्रित केले होते. सेवाभावी संस्थेचे शिष्टमंडळ आणि सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे अधिक्षक व अन्य अधिकारी यांच्यात सुमारे दीड तास चर्चा झाली. 

गुरुद्वारा बोर्डातील सर्व कर्मचार्‍यांची सेवाज्येष्ठता, त्यांची शैक्षणिक पात्रता, त्यांचा सेवाकाळ या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यासाठी चार सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती येत्या पंधरवाड्यात वरील बाबींचा अभ्यास करुन अहवाल देणार आहे. त्यानंतर प्रशासक डॉ.विजय सतबीरसिंघ हे कर्मचार्‍यांना त्यांच्या-त्यांच्या पात्रतेनुसार बढती वगैरे देतील, असे आजच्या बैठकीत ठरवले गेले. ही माहिती संस्थेचे अध्यक्ष मनबीरसिंघ ग्रंथी यांनी दिली. त्यामुळे सेवाभावी संस्थेचे शुक्रवारचे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे, असेही ग्रंथी यांनी कळविले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या