🌟राज्यातील १६ लाख विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा🌟
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी दहावीची परीक्षा आज शुक्रवार दि. २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे राज्यभरातून जवळपास १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. त्यात ८ लाख ६४ हजार ९२० मुले आणि ७ लाख ४७हजार ४७१ मुलींचा समावेश आहे राज्यातील ५१३० मुख्य केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.
राज्य शिक्षण मंडळामार्फत पुणे, नागपूर,छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा शुक्रवार, २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी एकूण १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये ८ लाख ६४ हजार १२० मुले, तर ७ लाख ४७ हजार ४७१ मुली आणि १९ ट्रान्सजेंडर यांचा समावेश आहे. २३ हजार ४९२ माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी ५ हजार १३० मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
मुंबई मंडळातून ३ लाख ६० हजार ३१७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये १ लाख ८८ हजार ३६७ मुले, तर १ लाख ७१ हजार ९४८ मुली आणि २ ट्रान्सजेंडर यांचा समावेश आहे. १ हजार ५५ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे."विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेत, महत्त्वाच्या विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावर १० समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात दोन समुपदेशक नेमण्यात आले आहेत," अशी माहिती माध्यमिक बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
परीक्षेच्या सुरळीत आयोजनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सहाय्यक परिरक्षकांना (रनर) गोपनीय पाकिटांच्या वितरणाचे चित्रीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य मंडळ आणि नऊ विभागीय मंडळांमध्ये नियंत्रण कक्ष आणि हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा केंद्रापासून ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर्स बंद ठेवण्यात आली आहेत. गैरप्रकार आढळल्यास संबंधितांविरुद्ध दखलपात्र आणि अदखलपात्र गुन्हे दाखल केले जातील. प्रत्येक केंद्रावर भरारी पथके तैनात केली जाणार आहेत.
💫दहावीच्या परीक्षेदरम्यान कॉपी रोखण्यासाठी राज्य मंडळाने कडक उपाययोजना :-
महाराष्ट्र माध्यमिक बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेदरम्यान कॉपी रोखण्यासाठी राज्य मंडळाने कडक उपाययोजना केल्या आहेत. केंद्रांवर ड्रोनद्वारे निरीक्षण केले जाणार आहे. केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची 'फेशिअल रेकग्निशन सिस्टीम'द्वारे तपासणी केली जात आहे. सर्व संबंधितांना अधिकृत ओळखपत्रे देण्यात आली आहेत.
0 टिप्पण्या