🌟राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न दिड महिन्यात मार्गी लावणार ?


🌟हिंगोलीतील आंदोलक शेतकऱ्यांना मुख्यमंत्री कार्यालयाचे आश्वासन🌟


राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न दिड महिन्यात मार्गी लावला जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री कार्यालयातून हिंगोलीच्या आंदोलक शेतकऱ्यांना बुधवारी ता. १२ सायंकाळी देण्यात आले आहे. तर हमी योजनेच्या कामांच्या बाबतीत जिल्हा प्रशासनाशी चर्चा करण्याचे या शेतकऱ्यांना सांगण्यात आले आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफ करून सातबारा कोरा करावा, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने पिकविमा द्यावा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरु करावीत, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी नामदेव पतंगे, गजानन कावरखे, दीपक सावके, प्रविण मते, राजेश मते, गजानन जाधव,शांतीराम सावके,दिपक सावके,यांच्यासह शेतकरी मंत्रालयासमोर अर्धनग्न आंदोलनासाठी गेले होते.


त्यानंतर या शेतकऱ्यांनी वाशी येथील चेकपोस्टवर पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी शेतकरी व पोलिसांमध्ये शाब्दीक चकमकही झाली. मात्र पोलिसांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन आझाद मैदान गाठले. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री कार्यालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी मुख्यमंत्री कार्यालयातील सचिव अमोल पाटणकर यांच्या सोबत शेतकऱ्यांची चर्चा झाली. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचा प्रश्न पुढील एक ते दिड महिन्यात मार्गी लावला जाणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. या शिवाय हमी योजना, पिकविमा संदर्भात जिल्हा प्रशासनाशी चर्चा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच अतिवृष्टीचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले आहे. त्यामुळे तुर्तास हे आंदोलन थांबविण्यात आले आहे.

💫तर या पुढे आणखी तिव्र आंदोलन करणार - नामदेव पतंगे,गजानन कावरखे

शासनाने शेतकऱ्यांना कर्ज माफी देऊन सातबारा कोरा करण्यासाठी दिड महिन्याची मुदत दिली आहे. या मुदतीत कर्जमाफी न झाल्यास यापुढेही आणखी तिव्र आंदोलन केले जाईल. या शिवाय हमी योजनेची कामे व पिकविम्याच्या प्रश्नावर दोन दिवसांत जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे......

✍️ - शिवशंकर निरगुडे (हिंगोली)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या