🌟क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे......!


🌟मला खात्री आहे की माझा आंबेडकरी समाज मरगळ झटकून लाँग मार्चमध्ये तन,मन,धनाने लाखोंच्या संख्येने सामील🌟


लेखक : अरुण निकम..✍️ 

परभणी मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेल्या काचेच्या बॉक्समधील संविधानाच्या प्रतिकृतीची दगड फेकून नासधूस केल्याप्रकरणी, आंबेडकरी संघटनांनी संविधानाच्या सन्मानार्थ निषेध व्यक्त करीत, दुसर्‍या दिवशी "परभणी बंद" ची हाक दिली. त्या दिवशी काही नतद्रष्ट समाज कंटकांनी दंगल माजवून जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी लाठीमार केला. त्याचप्रमाणे रात्री आंबेडकरी वस्त्यांमध्ये कोंबिंग ऑपरेशन करून कित्येक निरपराध आंबेडकरी अनुयायांना अमानुषपणे मारहाण केली. त्यावेळी त्यांनी महिलांना देखील सोडले नाही. त्या अटकसत्रात सोमनाथ सूर्यवंशी ह्या एल.एल. बी. च्या तिसर्‍या वर्षाचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला हकनाक अटक करून, त्याला पोलीस कोठडीत अमानुष मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. एकूणच त्या दरम्यानचा पोलिसी अत्याचार इतका अमानवी, क्रूर आणि पाशवी होता की, आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते विजय वाकोडे ह्यांना तो प्रकार सहन न झाल्यामुळे, त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यात त्यांचे निधन झाले. त्यामुळे सहाजिकच परभणीतील स्वाभिमानी जयभीमवाल्यांनी न्यायाची मागणी करीत आंदोलन पुकारले. त्याचाच एक भाग म्हणुन दिनांक 17/01/2025 पासून आशिष वाकोडे, सुधीर साळवे आणि इतर धुरंधर नेत्यांच्या नेतृत्वाखाली परभणी ते मंत्रालय असा लाँग मार्च निघाला आहे. तेव्हापासुन आतापर्यंत 22/23 दिवस झालेत, ते कट्टर भीमसैनिक आणि निडर माता, भगिनी कोणत्याही सुविधा नसतांना, ऊन, थंडीची पर्वा न करता निरंतर चालत आहेत. त्यात तर असेही लोक आहेत की, ज्यांच्या पायात साध्या चप्पल देखील नाही. परंतु केवळ बाबांवर असलेल्या निष्ठा आणि त्यामुळे बाणल्या गेलेल्या स्वाभिमानामुळे पाय जखमांनी रक्तबंबाळ होऊनही तसेच कैक लोक आजारी पडून देखील, ते अथकपणे मंत्रालयाच्या दिशेने कूच करीत आहेत. मी आशिष वाकोडे, सुधीर साळवे तसेच इतर लोकांशी सतत संपर्कात असल्यामुळे ह्या सर्व परिस्थितीतीबाबत अवगत असल्यामुळे, मी दिनांक 25/01/2025 रोजी एक लेख लिहून सत्य परिस्थिती कथन केली. व तमाम आंबेडकरी समूहाला आवाहन केले की, आपण सर्वांनी मिळून त्यांना मानसिक तसेच आर्थिक पाठबळ कर्तव्य भावनेने देण्याची नितांत आवश्यकता असल्यामुळे, ते पूर्णत्वास नेणे अभिप्रेत आहे. तो लेख कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष माननीय विजय जाधव ह्यांची 26 जानेवारीच्या कार्यक्रमात वाचून दाखवला. त्यावेळी तिथेल्या तिथे 25,000 रूपये जमा झाले. परंतु त्यांनी 50,000 रूपये निधी संकलित करण्याचा संकल्प करून सदर निधी दैनिक वृत्त रत्न सम्राटचे कार्यकारी संपादक कुणाल कांबळे ह्यांच्याकडे सुपूर्द केला. सदरचा निधी त्यांनी नाशिक मुक्कामी आशिष वाकोडे ह्यांच्या स्वाधीन केला.

       ह्याच कर्तव्य भावनेने मी, माझी मुलगी डॉ.सुप्रिया आणि पुतण्या विशाल निकम ह्यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील विंचूर गावी आवश्यक औषधांचे वाटप करून त्यांच्या जखमांवर औषधोपचार करण्याचा अल्प प्रयत्न केला आहे. ते वाटप करीत असतांनाच, तिथल्या तिथेच माझ्या माय, माऊल्यानी  पायांवर पेन किलर स्प्रे फवारणी करून व तळपायाला मलम लावन्यास सुरुवात केलेली पाहून मनाला समाधान वाटले एकूणच दलित पँथरच्या स्थापनेपासून आंबेडकरी समाजाचे स्वरुप तात्काळ प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे दिसून आले आहे. मग ती घटना वरळी दंगल,भागवत जाधवचे बलिदान असो की रीडल्स आंदोलन असो. किंवा बहिष्कार, अन्याय, अत्याचार, पुतळा विटंबना, रमाबाई नगर गोळीबार, किंवा नामांतर आंदोलन असो. त्यावर आंबेडकरी समाजाने तात्काळ प्रतिक्रिया व्यक्त करीत,अगदी बलिदान देण्याइतपत प्रतिक्रिया दिली आहे मग सहाजिकच प्रश्न पडतो की, आताच असे काय झाले आहे की, आपण ह्या आंदोलनाकडे  फक्त  मत व्यक्त करीत स्वस्थपणे बसुन आहोत ? असे तर नाही ना की, एकूणच आंबेडकरी समाज, आंदोलनकर्त्या भीम सैनिकांच्या,माता,भगिनींच्या खांद्याला खांदा भिडवून आंदोलन यशस्वी करण्यास  कुचकामी ठरला आहे की काय ? जर असे नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. 

        सदरचा लाँग मार्च नाशिक मधील पांडव लेणी या ठिकाणी पोहोचला आहे. अजूनही आपण त्यात लाखोंच्या संख्येने सामील होऊन जातीयवादी सरकारच्या छातीत धडकी भरवु शकतो तसेच आपल्या योग्य मागण्या पूर्णतया मान्य करून घेऊ शकतो तसेच हा लाँग मार्च यशस्वी करण्यासाठी आर्थिक पाठबळाची आवश्यकता लक्षात घेऊन कर्तव्य भावनेने निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. म्हणुन माझी मुलगी डॉ.सुप्रिया हिचा जी पे क्रमांक देत आहे. 

       जी पे क्रमांक 9167369272.

     मला खात्री आहे की, माझा आंबेडकरी समाज मरगळ झटकून लाँग मार्च मध्ये लाखोंच्या संख्येने सामील होऊन लाँगमार्च यशस्वी करील तसेच त्यांना आर्थिक पाठबळ देईल.....

सप्रेम जयभीम. 

लेखक : अरुण निकम..✍️

9323249487

दिनांक...08/02/2025.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या