🌟रविराज अशोकरावजी देशमुख सचिव जीवन ज्योत चॅरीटेबल ट्रस्ट परभणी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न🌟
परभणी :- परभणी येथील कृषि विज्ञान केंद्र येथे दि.21 फेब्रुवारी 2025 रोजी रविराज अशोकरावजी देशमुख सचिव जीवन ज्योत चॅरीटेबल ट्रस्ट परभणी यांच्या अध्यक्षतेखाली शास्त्रीय सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीसाठी डॉ.पी.आर.देशमुख, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी,वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी हे उद्घाटक तसेच डॉ.सय्यद शाकिर अली प्रमुख शास्त्रज्ञ अटारी पुणे आणि डॉ.जी.डी. गडदे विस्तार कृषि विद्यावेता तथा व्यवस्थापक, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.
या आढावा बैठकीमध्ये जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधी दरम्यान घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचा संक्षिप्त अहवाल व सन 2025 या वर्षाचा वार्षिक कृती आराखडा सादर करण्यात आला. सदर बैठकीमध्ये डॉ. प्रशांत भोसले, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शास्त्रज्ञांनी विभागनिहाय घेतलेल्या विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले. या सादरीकरणा अंतर्गत कृषि विज्ञान केंद्राचे विशेष उपक्रम, पिक प्रक्षेत्र चाचणी, आद्यरेषा पिक प्रात्यक्षिक, प्रशिक्षण व विस्तार कार्यक्रमांचा सविस्तर आढावा सादर करण्यात आला, तसेच प्रक्षेत्रावर कार्यरत असलेल्या विविध प्रकल्पांच्या उत्पादनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमासाठ उपस्थित असणारे प्रगतशील शेतकरी मा. . जनार्धन आवरगंड, रामेश्वर साबळे, दिगंबर अंभुरे, . प्रकाश हरकळ यांनी कृषि विज्ञान केंद्रामार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांबाबत समाधान व्यक्त केले. शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट व कृषि विज्ञान केंद्र यांनी एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव व शेतकमालावरील प्रक्रिया या घटकामध्ये काम करण्याची गरज व्यक्त केली.
डॉ. सय्यद शाकिर अली यांनी कृषि विज्ञान केंद्रांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या गरजानुरुप तसेच हवामान अनुकुल तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करावी असे सुचित केले.
मा. डॉ. जी. डी. गडदे, व्यवस्थापक, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी सदर बैठकीमध्ये आपले अभिप्राय देताना कृषि विज्ञान केंद्रामार्फत बीबीएफ व टोकण पध्दतीने सोयाबीन पिकाची प्रात्यक्षिके घेण्याबाबत सुचविले, ऊस पिकातील हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी मेटारायझीयम, रोगकारक सुत्रकृमींचा वापर करावा तसेच ऊस पिकामध्ये सुपर केन रोपवाटीकेद्वारे रोप निर्मिती करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच कृषि विभाग, आत्मा व कृषि विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि विभागाच्या योजना, एकात्मिक शेती पध्दतीबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व इतर विस्तार विषयक विशेष मोहिम कशा प्रकारे राबविता येईल याबाबत मार्गदर्शन केले.
मा. डॉ. पी. आर. देशमुख यांनी कृषि विज्ञान केंद्रामार्फत प्रात्यक्षिके, प्रशिक्षण व इतर विस्तार कार्यक्रम राबविताना शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेवर आधारीत कार्यक्रमांचे आयोजन करावे तसेच शेतमालावर प्रक्रिया करुन शेतकऱ्यांना कशाप्रकारे अधिकचा फायदा घेता येईल याबबात मार्गदर्शन करावे. तसेच कृषि विज्ञान केंद्रामार्फत वर्षभरात केलेल्या कामाची परिणामकारकता तपासुन त्याबाबतचा अहवाल संचालक विस्तार शिक्षण यांना सादर करावा अशा सुचना दिल्या. त्याच प्रमाणे कृषि विज्ञान केंद्र, परभणी यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध नाविन्यपुर्ण उपक्रमांबाबत समाधान व्यक्त केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. अरुणा खरवडे व आभार प्रदर्शन श्री. अमित तुपे यांनी केले. बैठकीच्या यशस्वीतेसाठी कृषि विज्ञान केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केले....
0 टिप्पण्या