🌟अशी माहिती महावितरण कंपनीकडून देण्यात आली🌟
महावितरणतर्फे अत्याधुनिक असे टीओडी (टाइम ऑफ डे) मीटर सर्व वीजग्राहकांना बसवले जात आहेत. हे मीटर प्रीपेड नाहीत. ज्या ग्राहकांना हे मीटर बसविले जात आहेत, त्यांना पूर्वीप्रमाणेच विजेच्या वापरानंतर मासिक बिल दिले जाणार आहे. या मीटरमध्ये कोणी फेरफार करण्याचा प्रयत्न केल्यास महावितरणला लगेच कळून वीजचोरी पकडली जाईल. या मीटरमधील सुविधेमुळे थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा महावितरण कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्येच बसून रिमोट पद्धतीने खंडित करता येणार आहे. यामुळे डिस्कनेक्शनसाठी लागणारा वेळ व मनुष्यबळ वाचणार आहे, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.
सध्या हे मीटर महावितरण, महापारेषणसह सर्व शासकीय कार्यालये व निवासस्थाने, मोबाइल टॉवर ग्राहकांना बसविले जात आहेत. नवीन वीजजोडणीसाठीही हे मीटर बसवले जात आहेत. नादुरुस्त मीटरच्या जागीही हे मीटर बसविले जात आहेत. यानंतर टप्प्याटप्प्याने सर्वच ग्राहकांना हे मीटर बसवले जातील.या मीटरमध्ये कम्युनिकेशन पोर्ट असून, मीटर महावितरणच्या सर्व्हरला जोडलेला असतो, त्यामुळे मीटरचा रिअल टाइम डेटा महावितरणकडे उपलब्ध होईल. हे मीटर टीओडी (टाइम ऑफ डे) असल्याने दिवसाच्या कोणत्या वेळेला किती वीज वापरतोय, याची अचूक माहिती ग्राहक व महावितरणला मिळेल.
💫४,६७५ ग्राहकांना बसविले मीटर :-
छत्रपती संभाजीनगर परिमंडळात आतापर्यंत ४ हजार ६७५ ग्राहकांचे आधीचे मीटर काढून टीओडी मीटर बसविण्यात आले आहेत. तसेच नवीन १ हजार १०५ वीजजोडणीसाठीही टीओडी मीटर बसविण्यात आले आहेत.
💫रीडिंगही ऑटोमॅटिक :-
या मीटरचे रीडिंग ऑटोमॅटिक होणार आहे. यात मानवी हस्तक्षेपाला अजिबात वाव नाही. ऑटोमॅटिक मीटर रीडिंगमुळे ग्राहकांना अचूक व वेळेवर बिले मिळतील. सध्या मीटर रीडिंग घेण्यासाठी मीटर रीडिंग एजन्सीला द्यावा लागणारा खर्च वाचणार आहे. सध्या रीडिंग घेताना काहीवेळा मीटर रीडर चुका करतात किंवा विलंब करतात, त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप होतो. मात्र टीओडी मीटरमध्ये ऑटोमॅटिक मीटर रीडिंगमुळे ग्राहकांचा त्रास वाचेल.
💫भुर्दंड नाही :-
हे मीटर बसविण्यासाठी ग्राहकांवर कोणत्याही प्रकारचा भुर्दंड बसणार नाही. ही केंद्र सरकारची योजना असल्याने मीटर बसविण्यासाठी केंद्राने निधी दिला आहे. टीओडी मीटर बसविल्याचा वीजदर वाढीवर कसलाही परिणाम होणार नाही.......
.✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या