🌟शिधापत्रिकांचे आधार प्रमाणिकरण ई-केवायसी अनिवार्य - जिल्हा पुरवठा अधिकारी जिवराज डापकर


🌟विशेष शिबिरांचे आयोजन २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत🌟

परभणी (दि.१३ फेब्रुवारी २०२५) : सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत रास्तभाव दुकानामधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब अन्न योजनेमधील लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. शिधापत्रिकेमधील मयत, कायमस्वरूपी स्थलांतरीत, आधार प्रमाणित नसलेले दुबार लाभार्थी वगळण्यात येऊन पात्र लाभार्थ्यांना अन्न धान्याचे वितरण व्हावे, यासाठी लाभार्थ्यांचे आधार प्रमाणिकरण व ई-केवायसी करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार सर्व शिधापत्रिकाधारकांनी आधार प्रमाणिकरण ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी जिवराज डापकर यांनी केले आहे.

आधार प्रमाणिकरण व ई-केवायसी करण्यासाठी गावोगावी शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. तसेच रास्तभाव दुकानस्तरावर देखील लाभार्थ्यांचे आधार प्रमाणिकरण व ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांनी आपल्या नजीकच्या रास्तभाव दुकानांमध्ये प्रत्यक्ष आधार कार्ड दाखवून अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करावायचे आहे. ही प्रक्रिया दिनांक २८ फेब्रुवारी, २०२५ पर्यंत करावी.  ई-केवायसी करायची राहिलेल्या लाभार्थ्यांचे धान्य वितरण बंद होण्याची शक्यता असल्याने सर्व लाभार्थ्यानी नजीकच्या रास्तभाव दुकानात २८ फेब्रुवारीपर्यंत ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी जिवराज डापकर यांनी केले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या