🌟राज्यातील नाशिक मध्ये देशातील पहिले प्री मॅरेज कौन्सिलिंग सेंटर सुरू करणार....!


🌟राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची घोषणा🌟  

✍️ मोहन चौकेकर                           

देशभरातील महिलांचे लैंगिक शोषण आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांना रोखण्यासाठी जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून येत्या 8 मार्चला देशातील पहिले  प्री मॅरेज कौन्सिलिंग सेटर ( विवाहपूर्व समुपदेशन केंद्र ) नाशिकमध्ये सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केली.


शासकीय कार्यालयांमध्ये महिलांच्या लैंगिक शोषण आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांची संयुक्त बैठक शुक्रवारी (दि. ७) पार पडली. बैठकानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर म्हणाल्या, 'शासकीय कार्यालयांमध्ये महिलांचे लैंगिक शोषण होते, परंतु बदनामीच्या भीतीमुळे अनेक महिला याबाबत आवाज उठवत नाहीत. महिला आयोगाला कौटुंबिक आणि लैंगिक हिंसाचाराच्या अनेक तक्रारी मिळतात, त्यापैकी ४५ टक्के तक्रारी कौटुंबिक हिंसाचाराशी संबंधित असतात. अन्याय झाल्यास न्यायालयाकडून न्याय मिळतो, मात्र या घटना रोखण्यासाठी समुपदेशन हाच प्रभावी उपाय आहे.'

याच दृष्टीने विवाहपूर्व समुपदेशन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, देशातील पहिले असे केंद्र नाशिकमध्ये सुरू होणार आहे. त्यानंतर राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये अशा केंद्रांची स्थापना करण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली.

💫विवाहपूर्व समुपदेशन केंद्र असे करेल काम :-

नवदाम्पत्यांच्या कुटूंबांचे संबंध चांगले रहावे यासाठी विवाहपूर्व समुपदेशन केंद्र काम करेल. त्यात मुलगा आणि मुलीला विवाहानंतर संबंध कसे टिकवायचे यासाठी माहिती देण्यात येईल. यासाठी प्रशिक्षित समुपदेशकाची नेमणूक करण्यात येईल. यासंबंधी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याशी चर्चा झाली असून महिलादिनी समपुदेशन केंद्र कार्यान्वित होईल, असे विजया रहाटकर यांनी सांगितले.

💫10 हजार विशाखा समितीसंदर्भात निर्णय घेणार :-

नाशिक शहर आणि जिल्ह्यात सुमारे 10 हजार विशाखा समित्या स्थापन केल्या आहेत. खासगी तसेच शासकीय आस्थापनांमध्ये स्थापन या समित्या केवळ कागदावरच आहेत. त्यांच्या माध्यमातून समुपदेशन करता येईल का यावरही लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे विजया रहाटकर यांनी सांगितले.

💫महिलादिनी प्रत्येक गावात ग्रामसभा घेणार - विजया रहाटकर 

महिलादिनी जिल्ह्यातील प्रत्येक गावात महिला ग्रामसभा घेण्यात येणार आहे. ग्रामसभेत लेक वाचवा, लेक शिकवा योजनेची महिती, कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी समुपदेशन आदींवर निर्णय घेण्यात येईल. मुलगा, मुलगी जन्माला आल्यास त्याचे स्वागत करण्याची जबाबदारी ग्रामसभेवर असेल. ग्रामसभेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येईल, अशी माहिती विजया  रहाटकर यांनी दिली.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या