🌟महाशिवरात्री विशेष‌ : श्री घृष्णेश्वर वेरूळ येथील महादेव मंदिराची शंकराच्या मंदिराची माहिती....!


🌟छत्रपती संभाजीनगर शहरापासून सुमारे २६ किलोमीटर अंतरावर आणि वेरूळ लेण्यांच्या पायथ्याशी हे मंदिर आहे🌟

✍️ मोहन चौकेकर 

घृष्णेश्वर / वेरुळ : वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे.शिवपुराण, रामायण महाभारत स्कंदपुराण या ग्रंथात घृष्णेश्वर वेरुळ या ठिकाणचा उल्लेख पहावयास मिळतो. छत्रपती संभाजीनगर शहरापासून सुमारे २६ कि.मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांच्या पायथ्याशी हे मंदिर आहे. संभाजीनगर मार्गे जाताना रस्त्यावर दौलताबाद देवगिरी किल्ला व श्री भद्रा मारुती दर्शन घडते.

छत्रपती संभाजीनगर वरून दर तासाला महानगरपालिकेच्या शहरबस उपलब्ध असतात.शिवपुराण, रामायण, महाभारत स्कंदपुराण या ग्रंथात घृष्णेश्वर वेरुळ या ठिकाणाचे उल्लेख मिळतात. वेरूळ महात्म्य अर्थात ब्रम्हसरोवर नामक ग्रंथात विविध युगात असलेल्या वेरुळच्या पुरातन नामांविषयी उल्लेख आहे. कृतयुगात शिवालय, त्रेतायुगात शिवस्थान, द्वापारयुगात एलापूर आणि कलियुगात नागस्थान अशी नावे असल्याचे समजते. नागस्थान म्हणजे वारूळ व वारूळ या शब्दचा अपभ्रंश वेरूळ असा झाला असावा, असे अभ्यासक मानतात. श्री आद्य शंकराचार्यांच्या श्लोकात 'घ्रुश्नेशंच शिवालये' असा उल्लेख येतो. वेरूळ येथे असलेल्या ३४ लेण्या त्यात राष्ट्रकुट राजांच्या लेखात असलेला एलापूर नामक उल्लेख हा वेरूळचाच आहे, असे भांडारकर यांनी सिद्ध केले आहे. महानुभाव पंथाचे श्री चक्रधर स्वामी यांच्या वास्तव्याने वेरूळ भूमी पवित्र झाली आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे आजोबा श्री मालोजीराजे भोसले यांचे पाटीलकीचे व वास्तव्याचे स्थान वेरूळ राहिलेले आहे.

💫भाविकांना रांगेतून जाण्यासाठी नियोजित व्यवस्था :-

या वेरूळ नगरीत श्री घृष्णेश्वर महादेव प्रकट झाल्याची कथा मोठी विलक्षण आहे. शिवालय तीर्थाच्या समीप भारद्वाज कुळात सुधर्मा नामक ब्राह्मण त्याची पत्नी सुदेहासोबत राहत होता. दोघे अत्यंत धार्मिक परंतु पूर्वकर्माचे फळ त्यांना पुत्रप्राप्ती होत नव्हती. समाजाच्या टीकेला कंटाळून सुदेहाने आपली लहान बहीण घृष्णा हिच्यासोबत सुधार्माने विवाह करावा, असा हट्ट धरला नाईलाजाने सुधार्माने घ्रुश्नेशी विवाह केला. कालांतराने त्यांना शिवदत्त नामक पुत्र झाला. घृष्णा अतिशय धार्मिक व शिवभक्त होती. ती रोज १०८ पार्थिव शिवलिंग तयार करून त्यांची पूजा करून पूर्णनद नामक डोहात विसर्जित करीत असे. तिचा हा नित्यक्रम बघून समाजात तिच्याबद्दल आदराचे स्थान वाढत होते. पुढे शिवदत्तचा विवाह सुमेधा नामक मुलीशी झाला. सगळे आनंदात सुरु असताना मात्र सुधर्माची पहिली पत्नी तथा घ्रुश्नेची मोठी बहिण सुदेहाच्या मनात घृष्नेबद्दल असूया निर्माण झाली. तिने घ्रुश्नेचा पुत्र शिवदत्त याची हत्या केली. त्याचा पार्थिव देह त्या डोहात फेकून दिला. सुधर्मा व सुमेधा शिवदत्तला शोधू लागले. परंतु तपास लागेना आपल्या पूजेत व्यस्त असलेल्या घ्रुश्नेला ही गोष्ट कळल्यावर ती शिवाचा धावा करू लागली. साक्षात शिव प्रकट झाले. व त्यांनी घ्रुश्नेला तिचा पुत्र पुन्हा जीवित करून दिला. सुदेहाला शिक्षा न करता आपण तिला अभय द्यावे तसेच ज्योतीरुपात येथे वास करावा, असे वरदान मागितले. भगवान शिवाने आपण घ्रुश्नेच्या नावाने येते घृष्णेश्वर म्हणून सदैव ज्योतीरुपात राहू व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करू असे वरदान दिले. जे आजही भक्तांना प्रचिती देतात.

💫मंदिराची बांधणी :-

मंदिराचे बांधकाम १५ व्या शतकात मालोजीराजे भोसले यांनी केल्याचे पुरावे आहेत त्यासंबंधीचा शिलालेख आजही मंदिराच्या भिंतीवर आहे. यानंतर अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचे भव्य काम १७ व्या शतकात केले जे आज आपल्यासमोर आहे मंदिर लाल अग्निज खडकात असून मंदिराचा अर्धा वरील भाग हा चुना व तत्सम पदार्थ वापरून उभारला आहे. आतील खांबांवर सुंदर नक्षीकाम असून गर्भगृहाच्या द्वारशाखेवरील रुद्राक्षाची माला खरी वाटावी इतकी सुंदर आहे. मंदिरात गणपती, अंबिका यांच्या मूर्ती आहेत. शिवपिंड हि पूर्वाभिमुख आहे व जुने मुख्यद्वार दक्षिणाभिमुख आहे. जे मंदिर स्थापत्य रचनेत दुर्मीळ आहे. मंदिर अत्यंत भव्य असून केंद्रीय पुरातत्व विभाग अत्यंत सुंदर रीतीने संवर्धन करीत आहे. मंदिरच्या प्रांगणात मोकळी जागा असून भाविक अत्यंत भक्तिभावाने शिव आराधना करतात.

💫शिवालय तीर्थ :-

मंदिरापासून साधारण ५०० मीटर अंतरावर वेरूळ येथे शिवालय तीर्थ या नावाने प्रसिद्ध कुंड आहे. हे तीर्थकुंड एक एकर परिसरात असून चारही बाजूने आत जाण्यासाठी प्रवेशद्वार आहेत. या कुंडाला एकूण ५६ दगडी पायऱ्या आहेत. या शिवालय कुंडात महादेवाची आठ मंदिरे आहेत. ही मंदिरे भारतातील अष्टतीर्थांची प्रतिकात्मक बांधकामे आहेत, असे सांगितले जाते. यात उत्तरेस काशी, ईशान्येस गया तीर्थ, पूर्वेस गंगा तीर्थ, आग्नेयेला विरज तीर्थ, दक्षिणेस विशाल नैऋत्येस नाशिक तीर्थ, इत्यादी आहेत. महिन्यातील प्रत्येक सोमवारी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग वेरूळ येथे राज्यासह परप्रांतातून दर्शनासाठी हजारो भाविक येतात असतात.

मंदिराचे व्यवस्थापन देवस्थान ट्रस्ट करीत आहे. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष योगेश टोपरे यांच्या द्वारे विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले जात आहेत. महाशिवरात्र उत्सव, श्रावण सोमवार व विविध मुहूर्तावर घ्रुष्णेश्वराची अलंकार पूजा बांधली जाते. सकाळी ५ दुपारी १२ व सायंकाळी ७ वाजता आरती पारंपरिक वाद्यांसह केली जाते. अधिक मासात ७०० ब्राह्मणांच्या सहाय्याने अतिरुद पूजा ५ दिवस अखंड चालते. वर्षभर मंदिरात गर्दी असते. सुनियोजित रांगांमुळे दर्शन सुलभ होते.

एल नावाच्या राजाची नगरी म्हणून व एलगंगा नावाच्या नदीकाठी वसलेले पुरातन नगर आज वेरूळ या नावाने प्रसिद्ध असले तरी पुराणकथा, स्थानिक विविध पोथी, लोककथा, महानुभाव साहित्य यातून वेरुळच्या विविध कथा आख्यायिका समोर येतात.

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या