🌟मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर येथे विद्रोही साहित्य संमेलन....!

 


📚साहित्य-संस्कृती जागरात सहभागाचे आवाहन📚


मुंबई : जनतेच्या क्रांतिकारी पर्यायी साहित्य-संस्कृतीच्या जागरात तन, मन, धनाने सहभागी होऊन विद्रोही संमेलन यशस्वी करावे असे आवाहन विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष प्रतिमा परदेशी यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषदेत केले आहे. 'मूठभर धान्य आणि एक रुपया विद्रोहीसाठी' अशी घोषणा देत देणाऱ्याला अहंकार वाटणार नाही आणि घेणाऱ्याला कमीपणा वाटणार नाही अशा सम्यक दानाच्या संकल्पनेला प्रतिसाद द्यावा असेही त्या म्हणाल्या.

संविधानिक मूल्यांना समर्पित, सत्यशोधक समाजाच्या १५१ व्या वर्षपूर्ती निमित्त भारतीय प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळीने १९ वे अ.भा. विद्रोही मराठी साहित्य संमेलन २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केले आहे. प्रसिद्ध साहित्यिक प्रा. अशोक राणा या संमेलनाचे अध्यक्ष आहेत तर हिंदी साहित्यिक कवल भारती उद्घाटक आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

उच्चजातवर्ग, हुकूमशाहीविरोधात पितृसत्ताक अ.भा. मराठी साहित्य संमेलन व त्यात जाणारे साहित्यिक एक शब्दही काढणार नाही. त्यांचा इतिहासच सत्ताधाऱ्यांची लाचारी करत दक्षिणा ओरबाडण्याचाच आहे. म्हणून तर कुठल्याही सांस्कृतिक राजकीय दहशतवादाला बळी न पडता अघोषित आणीबाणीला विरोध करत सामान्य जनतेच्या बाजूने उभे राहणे, हीच एकमेव लोकशाहीवादी, खरी समतावादी स्वाभिमानी सांस्कृतिक कृती आहे. यासाठी विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन संयोजन व त्यातील सहभाग महत्त्वाचा असल्याचे परदेशी यांनी सांगितले....

💫आर्थिक सहकार्याचे आवाहन :-

ब्राह्मणी मराठी साहित्य संमेलनाप्रमाणे विद्रोही साहित्य संमेलन सरकारी तिजोरीवर डल्ला मारुन भरविली जात नाहीत, तर जननिधीतून भरविली जातात. पेशवाई घाटात भोजनावळी उठविणे हे आपल्या साहित्य संमेलनाचे काम नाही, तर साधे जेवण आणि समतावादी साहित्य व मूल्य संस्कृतीचा महाजागर आणि विचारांची मेजवानी हे आपले वैशिष्ट्य आहे. त्यासाठी 'मूठभर धान्य आणि एक रुपया विद्रोही साठी' द्यावे, त्यासाठी संतांच्या आणि थोर पुरुषांच्या विचारांचा जागर करत वि.सा.च. चे कार्यकर्ते आपल्या गाव, बाडी, वस्तीत गाणी गात आणि पथनाट्य सादर करीत विद्रोहाचा जागर करत येत आहेत. आर्थिक व धान्यरुपी मदत करून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या