🌟आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ; १८ अभ्यासक्रमांना मिळणार शिष्यवृत्ती.....!


🌟राज्य सरकारने डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह निधी या योजनांची वाढवली व्याप्ती🌟

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी आता राज्य सरकारने राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती आणि डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह निधी या योजनांची व्याप्ती वाढवली आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे राबवण्यात येत असलेल्या बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस या व्यवस्थापनातील अभ्यासक्रमासह तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत असलेल्या १८ अभ्यासक्रमांचाही समावेश करण्यात आला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील पात्र विद्यार्थ्यांना उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती आणि डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह निधी या योजनांतर्गत दिलासा दिला जातो. शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीद्वारे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचे शुल्क उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून अदा केले जाते. वसतिगृहाचे शुल्क डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह निधीमार्फत दिले जाते.

२०२४-२५ पर्यंत तंत्रशिक्षण संचालनालयाकडून राबवल्या जाणाऱ्या बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस या आणि अशा १८ अभ्यासक्रमांसाठी या योजना लागू नव्हत्या. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता असूनही या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणे शक्य नव्हते. ही बाब लक्षात घेऊन तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीत असलेल्या या अभ्यासक्रमांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून नव्याने समावेश करण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखालील सचिवस्तरीय प्रदत्त समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

💫कोणत्या अभ्यासक्रमांचा समावेश :-

बीसीए, बीबीए, बीएमएस यांसह पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी स्तरावरील इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, आयसी मॅन्युफॅक्चरिंग, अँडव्हान्सड  कॉम्प्युटर अँपलिकेशन , टेक्निकल टेक्सटाईल, आर्किटेक्चरल असिस्टंटशिप, एकात्मिक एमबीए, एमबीए फार्मा टेक, एमबीए टेक कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अशा एकूण १८ व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आला आहे.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या