🌟मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांचा इशारा🌟
परभणी (दि.११ फेब्रुवारी २०२५) : परभणीमध्ये संविधानाची विटंबना केल्यानंतर संतप्त जनता रस्त्यावर उतरून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये जखमी झालेल्यांना राज्य सरकारने तातडीने नुकसान भरपाई देवून आंबेडकरी जनतेला न्याय द्यावा अन्यथा ०३ मार्च रोजी महाराष्ट्रातील सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, संविधानप्रेमी जनतेच्या वतीने आंदोलन करत मंत्रालयाला घेराव घालण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबिरे यांनी दिला आहे.
बुधवार १२ फेबु्रवारी रोजी मुंबईत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी हत्तीअंबीरे यांनी संवाद साधला. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते आणि स्लम सेल विभाग मुंबई अध्यक्ष सुरेशचंद्र राजहंस, अनुसूचित जाती विभाग मुंबई अध्यक्ष कचरु यादव, महासाचिब महेंद्र मुणगेकर, रमेश कांबळे, राज वाल्मिकी, व इतर उपस्थित होते.
पुढे बोलतांना हत्तीअंबीरे म्हणाले, परभणीमध्ये संविधानाची विटंबना केल्यानंतर संतप्त जनता रस्त्यावर उतरून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला. कोंबिंग ऑपरेशन करून शेकडो आंबेडकरी जनतेला बेदम मारहाण केली, अनेक निष्पाप नागरिकांना अटक केली. आंबेडकरी विचाराचा तरुण सोमनाथ सुर्यवंशी यालाही अटक करुन कोठडीत मारहाण केली, यातच त्याचा मृत्यू झाला, पण सरकारने या प्रकरणी पोलिसांवर कठोर कारवाई केली नाही. सुर्यवंशी मृत्यूची चौकशी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत करावी, तसेच संबंधित पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशा मागण्या हत्तीअंबिरे यांनी केल्या आहेत.
पोलिसांच्या कारवाईमुळेच सुर्यवंशी व आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांचा मृत्यू झाला. या घटनेला दोन महिने झाले तरी या दोन्ही कुटुंबांना अजून न्याय मिळालेला नाही, सरकार चौकशीच्या नावाखाली पोलिसांना वाचवत आहे, असा आरोप करी हत्तीअंबीरे यांनी सरकारने या पोलिसांवर कठोर कारवाई करावी, कोंबिंग ऑपरेशन दरम्यान ज्या आंबेडकरी लोकांवर गुन्हे दाखल केले ते तात्काळ रद्द करावे, सोमनाथ सुर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, सुर्यवंशी व वाकोडे यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकार नोकरीत सामावून घ्यावे, संबंधित पोलीसांवर हत्येच्या गुन्ह्यासह ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करावे, पोलिस मारहाणीत जखमी झालेल्यांना नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्या केल्या आहेत......
0 टिप्पण्या