🌟शेगाव येथे गजानन महाराजांचा १४७ वा प्रगटदिन मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरा🌟
✍️ मोहन चौकेकर
शेगाव : शेगाव येथे संत गजानन महाराज यांचा १४७ वा प्रकटदिन उत्सव माघ वद्य सप्तमी दि.२० फेब्रुवारी २०२५ रोजी श्री संस्थानच्या धार्मिक प्रथा-परंपरांनुसार मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यावेळी श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांच्या मांदियाळीने मंदिर परिसर फुलून गेला होता.
प्रकटदिन पर्वावर काकडा, गाथा भजन, प्रवचन, हरिपाठ, श्रीहरी कीर्तन आदी कार्यक्रम झाले. त्याचबरोबर सकाळी १० वाजता श्री महारूद्र स्वाहाकार यागाची पुर्णाहुती झाली. दुपारी श्रींच्या पालखीची नगरपरिक्रमा निघाली. प्रकटदिन उत्सवात १००१ भजनी दिंड्यांनी सहभाग घेतला. यापैकी १०९ नवीन भजनी दिंड्यांना टाळ, वीणा, मृदंग व संत वाड्मयीन सामग्री वितरित करून वारक-यांचा सन्मान करण्यात आला.
जुन्या दिंड्यांना भजनी साहित्य दुरूस्तीसाठी सानुग्रह अंशदान देण्यात आले. प्रकटदिनानिमित्त श्री गजानन महाराज मंदिर परिसर विद्युत रोषणाई व केळीचे खांब व फुलांनी सुशोभित करण्यात आला होता. 'गण गण गणात बोते 'या नामघोषाने भक्तीचा मळा फुल्यांचे चैतन्यमयी चित्र दिसून येत होते. लाखोंच्या संख्येने आलेल्या भाविकांनी शिस्तबद्ध रांगामधुनतून दर्शन व महाप्रसाद घेतला.
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या