🌟मध्यस्थी व्यक्तींकडून वादावर तोडगा काढण्याचा प्रभावी मार्ग - सरन्यायाधीश संजीव खन्ना


🌟नागपूर येथील महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या तिसऱ्या पदवीदान समारंभात ते बोलत होते🌟

मुंबई : न्यायालयात सर्वच वाद नेण्यास योग्य नसतात. मध्यस्थी व्यक्तींकडून वादावर तोडगा काढण्याचा प्रभावी मार्ग असतो मध्यस्थी व्यक्ती केवळ न्यायच देत नाही तर दुभंगणारे नातेसंबंध देखील मजबूत करतो असे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी नागपूर येथील महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या तिसऱ्या पदवीदान समारंभात बोलताना काल शनिवार दि.१५ फेब्रुवारी रोजी स्पष्ट केले प्रत्येक प्रकरण केवळ कायदेशीर दृष्टिकोनातून न पाहता ते एक मानवी कथा म्हणूनही समजून घ्यावे लागते असे त्यांनी नमूद केले. भारतीय कायदेशीर मदत प्रणाली जगातील सर्वात प्रभावी आहे आणि येथे सर्व पक्षकारांना म्हणजे आरोपी तसेच पीडितांना मदत दिली जाते, असे त्यांनी सांगितले.

सरन्यायाधीश संजीव खन्ना म्हणाले सर्वच वाद न्यायालयीन लढाई किंवा पंचायतीद्वारे (ऑर्बिट्रेशन) सोडविले जाऊ शकत नाहीत. मध्यस्थी हा अधिक प्रभावी पर्याय आहे, जो केवळ तडजोडीचे नाही तर सर्जनशील तोडगेही देतो.या प्रक्रियेमुळे प्रश्न सोडवण्याच्या मर्यादित पर्यायांपलीकडे जाऊन सर्जनशील तोडगे मिळू शकतात. त्याचवेळी, लोकांमधील तसेच व्यवसायांमधील संबंध अधिक दृढ होतात. ते पुढे म्हणाले वकील हे समस्या सोडवणारे असतात. त्यांना फक्त कायदेशीर पैलूच नव्हे तर मानवी पैलूदेखील विचारात घेऊन उपाय शोधावे लागतात. समस्या एका ठरावीक चौकटीत बसत नाहीत. त्यामुळे त्यांच्या उपायांमध्येही लवचिकता असावी लागते. अन्यथा, न्याय मिळवण्याचा मार्गच अडथळा ठरेल, असेही सरन्यायाधीश म्हणाले.

लोकशाही स्वतःही तंत्रज्ञान आणि सामाजिक बदलांमुळे नव्याने आकार घेत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ही केवळ तत्त्वचिंतनातील समस्या नाही, तर मानवता, स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठेसमोरील गंभीर आव्हाने आहेत, ज्यांना नावीन्यपूर्ण उपायांची गरज आहे. सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले की, एक मजबूत कायदेशीर मदत प्रणाली आणि तरुण वकिलांची ऊर्जा यांचे मिश्रण केल्यास भारत न्यायप्रणालीतील प्रवेशयोग्यता यामध्ये जागतिक नेता बनू शकतो कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि एमएनएलयूचे कुलगुरू बी. आर. गवई यांनी महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.या विद्यापीठाच्या स्थापनेत मोलाचे सहकार्य दिल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष आभार मानतो, असे न्या. गवई म्हणाले......

🌟डिजिटल युगात गोपनीयता,सुरक्षा आणि मानवी संवादाच्या स्वरूपावर नवे प्रश्न निर्माण होत आहेत - सरन्यायाधीश

सरन्यायाधीशांनी न्याय वितरण अधिक कार्यक्षम आणि वेळेवर करण्यासाठी पारंपरिक चौकटीबाहेर विचार करण्याचे आवाहन केले. आजच्या पिढीसमोर असे अनेक प्रश्न आहेत, जे पूर्वीच्या पिढ्यांना सहन करावे लागले नव्हते. उदा. हवामान बदल, जो केवळ पर्यावरणासाठीच नाही, तर मानवी हक्क आणि सामाजिक न्यायासाठीही धोका आहे. तसेच डिजिटल युगात गोपनीयता, सुरक्षा आणि मानवी संवादाच्या स्वरूपावर नवे प्रश्न निर्माण होत आहेत, असे ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या