🌟नवी मुंबई महानगर पालिकेतील ८००० कंत्राटी सफाई कामगार🌟
✍️ मोहन चौकेकर
मुंबई (दि.१७ फेब्रुवारी २०२५) : नवी मुंबई महानगर पालिकेत कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न लवकरच निकाली काढण्यात येईल. यासंदर्भात नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त यांना मार्गदर्शन करून उचित मार्ग काढून कंत्राटी कामगारांचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे सांगण्यात आले असल्याचे कामगार मंत्री आकाशभाऊ फुंडकर यांनी सांगितले.
नवी मुंबई महानगर पालिकेतील ८००० कंत्राटी सफाई कामगार तसेच ठोक मानधन रोजंदारी तत्वावर काम करणाऱ्या १००८ कामगारांच्या वेतनाबाबत आज कामगार मंत्री यांच्या मंत्रालयीन दालनात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस माजी खासदार तथा श्रमिक संघटनेचे अध्यक्ष संजीव नाईक, कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन, नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त कैलास शिंदे, कामगार विभागाचे अधिकारी, विविध कामगार संघटनेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत महापालिका आयुक्तांच्या स्तरावर एका समितीचे गठण करण्यात आले असून या समितीचा अहवाल लवकर महानगर पालिकेकडे सादर केला जाणार आहे. या समितीच्या अहवालानंतर कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला जाईल, असेही मंत्री आकाशभाऊ फुंडकर यांनी सांगितले. कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा विषय हा त्या त्या महानगर, नगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीशी संबंधित असल्याने आयुक्तांनी कामगारांच्या वेतन प्रश्नांवर सहानुभूतीने विचार करावा, असेही कामगार मंत्री आकाशभाऊ फुंडकर यांनी सांगितले...
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या