🌟पुर्णेतील पवार महाविद्यालयात मराठी भाषा विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्षीय समारोपात ते म्हणाले🌟
पूर्णा (दि.२७ फेब्रुवारी २०२५) :- मातृभाषा हिच सर्वश्रेष्ठ भाषा असते असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार यांनी केले ते स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयातील मराठी भाषा विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या मराठी भाषागौरव दिन व कुसुमाग्रज यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात अध्यक्षीय समारोपात बोलत होते मराठी भाषा ही प्राचीन भाषा असून ती समृद्ध आहे जन्मापासून अवगत करतो तीच आपली मातृभाषा असते मातृभाषेतून बालमनावर बिंबवलेला संस्कार कायम असतो.
मात्र जीवन व्यवहारात मातृ भाषेबरोबरच इतर भाषाही महत्त्वाच्या असतात त्यामुळे आपण आंतरराष्ट्रीय भाषाही शिकल्या पाहिजेत. मातृभाषेचे व्याकरण पक्के झाले तरच इतर भाषा अवगत करण्यासाठी सोपे जाते म्हणून कोणताही संकोच न करता आपले अनुभव, आपल्या नात्यातील नातेवाईकांशी झालेला संवाद, निसर्ग , प्रवास वर्णन यांचे लेखन आपण आपल्या भाषेत केले पाहिजे. त्यामुळे आपली भाषा निश्चितच समृद्ध होते आणि ज्ञानात भर पडते. मराठी भाषेच्या गौरवासाठी आपण सर्वांनी मराठी भाषेचे वाचन लेखन करणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी महाविद्यालयातील गृहविज्ञान विभाग प्रमुख तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य प्राध्यापक डॉ. सुरेखा भोसले यांनी आपल्या मार्गदर्शनात भाषा गौरव दिनाचे महत्त्व सांगताना कुसुमाग्रज यांचे साहित्य व मराठी भाषेचा इतिहास यावर प्रकाश टाकला. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपण म्हणी ,वाक्प्रचार, जात्यावरील ओव्या , गाणी यांचे जतन केले तर मराठी भाषेचा खऱ्या अर्थाने गौरव होईल असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मराठी भागातील प्राध्यापक डॉ. संजय कसाब यांनी कुसुमाग्रजांच्या जीवनावर प्रकाश टाकून भाषा गौरव दिनाचे महत्त्व सांगितले. तर मराठी विभाग प्रमुख प्रा .डॉ. मा.बा. भोसले यांनीही आपल्या मनोगतात मराठी भाषेचे वैभव आणि आजचे वास्तव यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कला व्दितीय वर्षाची विद्यार्थीनी छकुली परडे यांनी केले तर आभार कला द्वितीय वर्षाची विद्यार्थीनी प्रतीक्षा मुळे यांनी मानले या कार्यक्रमासाठी मराठी विभागातील विद्यार्थी, प्राध्यापक ,कर्मचाऱ्यां यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक ,कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या