🌟मुंबईत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच घरांची विक्रमी खरेदी....!


🏘️मागील १३ वर्षांतील जानेवारी २०२५ मध्ये सर्वाधिक मालमत्ता नोंदणी🏘️

मुंबई :  मुंबईत दरवर्षीच्या तुलनेत नवीन वर्षाच्या पहिल्याच जानेवारी २०२५ या महिन्यात यंदा घरांची चांगली खरेदी झाली आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात घर खरेदीला चांगलेच भरभराटीचे सुगीचे दिवस आले आहेत. मुंबई शहरात जानेवारी महिन्यात मागील १३ वर्षातील सर्वाधिक मालमत्ता नोंदणी झाली आहे. मात्र गत वर्षीच्या डिसेंबर महिन्याच्या तुलनेत जानेवारी २०२५ मध्ये घर खरेदीत तब्बल ५ टक्के घट झाली आहे.

मालमत्ता सल्लागार नाइट फ्रैंक इंडियाच्या अहवालानुसार जानेवारी २०२५ मध्ये मुंबईत अंदाजे ११ हजार ७७३ मालमत्ता नोंदणी झाली. गेल्या १३ वर्षातील जानेवारीतील ही ७ टक्के वाढ आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या घर खरेदीमुळे मुद्रांक शुल्क संकलनात ९५२ कोटींहून अधिक उत्पन्न मिळाले. मात्र महिन्या दरमहिना (मासिक) आधारावर मालमत्ता नोंदणींमध्ये ५ टक्केंची किंचित घट झाली आहे. तर डिसेंबर २०२४ च्या तुलनेत महसूल संकलनात १६ टक्के घट झाली.

या अहवालानुसार ग्राहकांनी प्रीमियम रिअल इस्टेटला मोठी पसंती दर्शविली आहे. जानेवारी २०२४ मध्ये २ कोटी आणि त्याहून अधिक किमतीच्या मालमत्तांच्या नोंदणीचा वाटा १६ टक्के होता. तो जानेवारी २०२५ मध्ये १९ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

जानेवारी २०२५ मध्ये या विभागात २ हजार २९८ व्यवहार झाले. जे लक्झरी घरांसाठी चांगली मागणी दर्शवितात. तर याच कालावधीत ५० लाखांपेक्षा कमी किमतीच्या मालमत्तांच्या नोंदणीचा वाटा ३१ टक्क्यांवरून २८ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. त्यामुळे उच्च किमतीच्या मालमत्तांकडे खरेदीदारांच्या पसंतींमध्ये बदल झाल्याचे दर्शवित आहे.

घर खरेदीत मुंबईच्या पश्चिम आणि मध्य उपनगरांनी वर्चस्व कायम ठेवले आहे. शहराच्या एकूण मालमत्ता नोंदणींमध्ये ८६ टक्के योगदान दिले. मात्र मध्य उपनगरांतील बाजारपेठेमधील वाटा २९ टक्क्यांवरून ३३ टक्क्यापर्यंत वाढला आहे, तर पश्चिम उपनगरांचा वाटा ५७टक्क्यांवरून ५३ टक्क्यापर्यंत घसरला आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या