🌟भाजपचे नेते मा.खा.किरीट सोमय्या यांची माहिती : पोलिसांबरोबर साधला संवाद : जिल्ह्यात २ हजार ९०० बोगस प्रमाणपत्रे🌟
परभणी (दि.२८ फेब्रुवारी २०२५) : परभणी जिल्ह्यात बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांनी घुसखोरी केली असून जिल्ह्यात तब्बल २ हजार ९०० अपात्र अनाधिकृत घुसखोर अर्जदारांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनावट शपथपत्र तयार करीत जन्म प्रमाणपत्र प्राप्त केले असल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी केला या प्रकरणात येत्या ४८ तासात संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती दिली.
भाजपचे ज्येष्ठ नेते सोमय्या यांनी आज शुक्रवार दि.२८ फेब्रुवारी रोजी पुन्हा परभणी शहराचा दौरा केला शहरातील नवा मोंढा पोलिस ठाण्यात जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक यशवंत काळे,पोलीस उपअधीक्षक डंबाळे व अन्य अधिकार्यांबरोबर जन्म प्रमाणपत्र घोटाळ्या संदर्भात संवाद साधला त्यातून परभणी जिल्ह्यात २ हजार ९०० व्यक्तींनी खोट्या कागदपत्रांआधारे भारतीय नागरिकत्व मिळविण्याचा प्रयत्न केला असल्याचे निदर्शनास आणून दिले त्या बांगलादेशी बोगस जन्मप्रमाणपत्राशी संबंधित काही कागदपत्रेही सादर केली.
पाठोपाठ परभणी तहसील कार्यालय गाठून तेथील वरिष्ठ अधिकार्यांबरोबर या घोटाळा प्रकरणाबाबत चर्चा केली. घुसखोरी संदर्भातील पुरावे सादर केले. त्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना ज्येष्ठ नेते सोमय्या यांनी, बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणी येत्या 48 तासांत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल, असा विश्वासही व्यक्त केला. यावेळी भाजपचे नेते डॉ. केदार खटींग, बाळासाहेब जाधव, माजी नगरसेविका मंगला मुदगलकर, कमलकिशोर अग्रवाल, सुनील देशमुख, दिनेश नरवाडकर, संजय रिझवानी, शर्मा आदी उपस्थित होते.
💫महाराष्ट्रात २ लाख बांग्लादेशी घुसखोरीचा प्रयत्न :-
भारत देशात १९६९ च्या कायद्यानुसार मॅजिस्ट्रेट कोर्टात अर्ज करून जन्म व मृत्यूची नोंद करता येत असल्याने ५० वर्षात बहुतांश नागरिकांनी ती प्रमाणपत्रे काढून घेतली. मात्र नोव्हेंबर २०२३ मध्ये संसदेने या कायद्यात केलेल्या बदलामुळे जन्माचे दाखले देण्याचे अधिकारी तहसीलदारांना मिळाले. तेव्हापासून बोगस आधारकार्ड, रेशनकार्ड व इतर खोट्या कागदपत्रांआधारे हजारो बांग्लादेशींनी ठिकठिकाणी तहसील कार्यालयातून अर्ज केले आणि तहसीलदारांनी त्यांना जन्मदाखले दिल्याचे गंभीर प्रकार महाराष्ट्रात समोर आले, असे ते म्हणाले. जुलै ते डिसेंबर २०२४ या काळात सर्वाधिक अर्ज दाखल झालेले असून एका दिवसात १५० सुनावण्या घेऊन ते निकाली काढल्याचे प्रकार महसूल अधिकार्यांनी केले आहेत, हे धक्कादायक प्रकार मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर घडल्याचे ते म्हणाले.
परभणी जिल्ह्यात अशाच प्रकारे ३ हजार २०० अर्ज करण्यात आले. यातील १२ अर्ज रद्द झाले असून सुमारे २९०० अर्जदार बोंगस असून त्यांनी खोट्या कागदपत्रांआधारे भारतीय नागरिकत्व मिळविण्याचा प्रयत्न करून सरकारची फसवणूक केली आहे, त्यांच्याविरोधात लवकरच कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असे नमूद केले.......
0 टिप्पण्या