🌟परभणी महानगर पालिकेचा महत्वपूर्ण निर्णय : विलंब शास्तीत सुट अभय योजना 15 फेबु्रवारी पर्यंत राबवणार....!


🌟मालमत्ता कर विलंब शास्तीमध्ये 90 टक्के तर पाणीपट्टी विलंब शास्तीमध्ये 100 टक्के सुट🌟

परभणी (दि.01 फेब्रुवारी 2025) : परभणी महानगर पालिका प्रशासनाने सुरू केलेल्या अभय योजनेस नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचा दावा करीत महानगर पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक धैर्यशिल जाधव यांनी यामुळेच एक वेळची बाब म्हणून मालमत्ता कर विलंब शास्तीमध्ये 90 टक्के तर पाणीपट्टी विलंब शास्तीमध्ये 100 टक्के सुट अभय योजना  15 फेब्रुवारीपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

         परभणी महानगर पालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर व पाणी पट्टी थकीत आहे. मालमत्ता कर व  पाणीपट्टी चांगल्या पद्धतीने वसुली होण्यासाठी आयुक्तास आपल्या स्वेच्छा निर्णयानुसार महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार विलंबशास्ती माफीचे अधिकार प्राप्त आहेत. त्यानुसार आयुक्त धैर्यशील जाधव यांनी आदेश पारीत करून मालमत्ता कर व  पाणीपट्टी विलंबशास्तीत सुट अभय योजना जाहीर केली होती. यामध्ये दि. 16 ते 31 जानेवारी 2025 रोजी पर्यंत चालू वर्षापर्यंतचा मालमत्ता कर व  पाणीपट्टी  एकरकमी भरल्यास मालमत्ता कर विलंब शास्तीमध्ये 90 टक्के तर पाणीपट्टी विलंब शास्तीमध्ये 100 टक्के सुट अभय योजना जाहीर केली होती.  योजनेस नागरिकांनी चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे या योजनेस आता 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

अभय योजना ही केवळ  विहीत मुदतीत चालू वर्षापर्यंतचा मालमत्ता कर व पाणीपट्टी एकरकमी भरणा करणार्‍या मालमत्ताधारकांनाच लागू असणार आहे. यामुळे नागरिकांनी मुदतीत चालू वर्षापर्यंतचा मालमत्ता कर व  पाणीपट्टीचा एकरकमी भरणा करून अभय योजनेचा लाभ घेण्याचे व वसुलीसाठी येणार्‍या वसुली पथकांना सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त जाधव यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या