🌟तर धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरु देणार नाही : मनोज जरांगे पाटील यांचा इशारा....!


🌟परभणीतील प्रचंड मूक मोर्चातून नेत्यांची परखड टिका : देशमुख हत्येतील आरोपींना मोक्का लावून फाशी देण्याची मागणी🌟


परभणी (दि.०४ जानेवारी २०२५) : बिड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच स्व.संतोष देशमुख यांच्या निर्घूण हत्येच्या घटनेनंतर सुध्दा त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांना सातत्याने धमकाविण्याचे गंभीर प्रकार घडले आहेत. यापुढे जर असे प्रकार घडले तर आम्ही धनंजय मुंडे यांना रस्त्यावरसुध्दा फिरु देणार नाहीत असा थेट इशारा मराठा आरक्षण आंदोलनातील नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.


यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की गेल्या वीस वर्षांपासून बिड जिल्ह्यातील बिडसह परळी केज या भागात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली असून वाळू माफिया,राख माफिया,भूखंड माफियांनी अक्षरशः पैसा आणि सत्तेच्या जोरावर अन्याय,अत्याचार सुरु केले आहेत परळी व बीड आता गुन्हेगारीत बिहारच्या पुढे गेले आहे असा आरोप आज  शनिवार दि.०५ जानेवारी रोजी परभणीत आयोजित केलेल्या मूक मोर्चाच्या समारोपीय सभेतून यावेळी उपस्थित नेतेमंडळींनी केला.

            येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मस्साजोग येथील सरपंच कै. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ विविध मागण्यांकरीता सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, सर्वजातीय व सकल मराठा समाजासह विविध सामाजिक संघटना, संस्थांतर्फे नूतन महाविद्यालयापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरापर्यंत मोठा मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचा समारोप जाहीर सभेद्वारे झाला. यावेळी व्यासपीठावर संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणे,अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील,ज्योतीताई मेटे यांच्यासह स्व. देशमुख यांच्या मातोश्री,बंधू,बहिण,मुलगा व मुलगी असा परिवार व्यासपीठावर उपस्थित होता.

            यावेळी आपल्या भाषणातून जरांगे पाटील यांनी स्व. संतोष देशमुख यांची निर्घूण हत्या म्हणजे क्रुरपणाचा प्रकार आहे. या हत्येनंतरसुध्दा देशमुख कुटूंबियांना धमकावण्याचे प्रकारसुध्दा घडू लागले आहे. या पुढील काळात धमकाविण्याचे असे प्रकार होवू नयेत, तसेच प्रकार आढळून आल्यास परळीतील त्या त्या नेतेमंडळींना राज्यातसुध्दा फिरु देणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

            यावेळी विविध वक्त्यांनी आपल्या भाषणांमधून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीवर काही कुटूंबियांनी सुरु केलेल्या दादागिरीवर कडाडून हल्ला चढवला. या जिल्ह्यात एवढी दादागिरी वाढली आहे की, सर्वसामान्य नागरीकांनासुध्दा या दादागिरीच्या धास्तीने, भितीने या जिल्ह्यातून पलायन करत आहेत. त्यांचे अनेक उदाहरणे आहेत, असे म्हटले. या दादागिरीमागे निश्‍चितच मोठी राजकीय ताकद आहे. या ताकदीच्या आशिर्वादानेच वाळू माफिया, राख माफिया, भूखंड माफियांनी संपूर्ण जिल्ह्यात मोठा हैदोस घातला आहे. अन्याय, अत्याचाराच्या दैनंदिन घडामोडींनी अक्षरशः कळस गाठला आहे, असे नमूद करीत या नेतेमंडळींनी पापाचा घडा आता भरला आहे, त्यामुळेच या मंडळींचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याकरीता या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. सरकारने हे प्रकरण हलक्यात घेवू नये, अन्यथा ही वादळापूर्वीची शांतता असेल, असा इशाराही दिला.

           राज्य मंत्री मंडळातील मंत्र्यांनीसुध्दा कोण्या गुन्हेगाराला पाठीशी घालू नये, असेही ते नेतेमंडळींनी नमूद करीत या प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर धनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्विकारुन राजीनामा द्यावा, अशीही मागणी केली. परभणी येथील स्व. सोनाथ सुर्यवंशी यांच्या कुटूंबियांना न्याय मिळावा, लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटूंबियांनाही सर्वतोपरि न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

            यावेळी आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात सीआयडीमार्फत चौकशी सुरु आहे, परंतु दोषींवर मोक्कांतर्गत गुन्हे दाखल केले पाहिजेत, या गुन्हेगारांचा तपास सीआयडीने केला पाहिजे, जो कोणी दोषी असेल, त्यास फासावर लटकविले पाहिजे, तसेच या प्रकरणामागील मास्टरमाइंडचासुध्दा शोध लावला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

           या प्रसंगी खासदार संजय जाधव यांनी, माणुसकीचा खून करण्याचं काम आमच्या शिवशेजारच्यांनी केलं आहे, स्व. संतोष देशमुख यांच्या कुटूंबियांना आता न्याय हवा आहे, तो अद्यापपर्यंत मिळालेला नाही, सरकारने दखल घेतली पाहिजे, ही वादळापूर्वीची शांतता आहे, परळी क्रौर्य आणि अन्यायाचं केंद्र बनलं आहे, कोणतेही नियम, कायदे तिथले काही लोक मानत नाहीत. पैशाच्या हव्यासापोटी माणुसकी सोडली गेली आहे, त्यामुळे या मंडळींना मोकाट सोडून चालणार नाही, असे ते म्हणाले. धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशीही मागणी केली.

             आमदार राजेश विटेकर यांनी माणुसकीला काळीमा फासणार्‍या मस्साजोग येथील घटनेचा निषेध व्यक्त केला. स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका मांडली.

             आमदार डॉ. राहुल पाटील यांनी स्व. देशमुख यांचा आत्मा टाहो फोडून न्याय मागतोय. गुन्हेगारांना फाशी द्या. क्रूरकर्म्यांना माफी नको! त्यांना फाशी द्या, अशी आर्त हाक आहे. कालच्या अधिवेशनात विधानसभेत आपण या प्रकरणात आवाज उठवला, परंतु न्याय मिळेपर्यंत अखेरच्या क्षणापर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असाही इशारा आमदार पाटील यांनी दिला.

              यावेळी वैभवी देशमुख यांच्यासह अन्यजणांची भाषणे झाली. याप्रसंगी स्थानिक खासदार संजय जाधव, ज्येष्ठ नेते माजी आमदार सुरेश वरपुडकर, माजी आमदार सुरेशदादा देशमुख, आमदार डॉ. राहुल पाटील, माजी आमदार अ‍ॅड.विजय गव्हाणे, आमदार राजेश विटेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे, प्रविण देशमुख, माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे, डॉ. विवेक नावंदर, डॉ. विद्या चौधरी, रविराज देशमुख, काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, भारतीय जनता पार्टीचे नेते डॉ. केदार खटींग, सुभाष जावळे पाटील, गणपत भिसे, अजयराव गव्हाणे, श्रीधरराव देशमुख, अमोल जाधव, अरविंद काका देशमुख, रवि पतंगे, संजय गाडगे, विनोद कदम, सुनील देशमुख, सचिन देशमुख, किशोर रणेर  यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासभेचे प्रास्ताविक सुभाष जावळे यांनी केले......

            

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या