🌟महाराष्ट्र राज्य मंत्रालयात कार्यरत महिला कर्मचाऱ्याची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोघा भामट्यांना अटक....!

 


🌟अटक केलेल्या भामट्यांची अर्जुन काळे आणि बालाजी रोहिदास पवार अशी नावे🌟

मुंबई : मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम विभागात स्वच्छक या पदावर कार्यरत महिला कर्मचाऱ्याला शेठला मुलगा झाला असून शेठकडून गरीब महिलांना साड्यांसह इतर साहित्याचे वाटप सुरू असल्याची बतावणी करून मंत्रालयातील या महिलेची फसवणूक करणाऱ्या दोघांना सहा वर्षांनी डी.बी.मार्ग पोलिसांनी अटक केली अर्जुन बापूनाथ काळे आणि बालाजी रोहिदास पवार अशी या दोघांची नावे असून ते दोघेही बोरिवली व माहीमचे रहिवासी आहेत. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

गिरगाव येथे राहणारी ५७ वर्षांची तक्रारदार महिला गेल्या २५ वर्षांपासून मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम विभागात स्वच्छक या पदावर कामाला आहे. ऑक्टोंबर २०१९ रोजी तिच्यावर निवडणुक कामाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यामुळे दिवसभराचे काम संपल्यानंतर ती तिच्या घरी जात होती. बांधकाम भवन येथून सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाताना तिला एक तरुण भेटला. त्यांच्या शेठला बऱ्याच वर्षांनी मुलगा झाला असून गरीबांना साड्या आणि इतर साहित्याचे वाटप करत आहे. तुम्ही आमच्यासोबत चला असे सांगितले. सुरुवातीला तिने नकार दिला, मात्र त्याने खूपच जबरदस्ती केल्यानंतर ती त्याच्यासोबत जाण्यास तयार झाली. डी. एन. रोडजवळील मॅकडोनाल्डजवळ तिला आणखीन एक तरुण उभा असल्याचे दिसून आले. या दोघांनी तिला अंगावरील सर्व दागिने काढण्यास सांगितले. त्यामुळे तिने तिचे दागिने व कॅश एका रुमालात बांधून ठेवले. त्यानंतर या दोघांनी हातचलाखीने ते दागिने व कॅश असलेले रुमाल घेऊन पलायन केले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांना गेल्या सहा वर्षांपासून आरोपींचा थांगपत्ता लागत नव्हता. अखेर या दोघांनाही शनिवारी पोलिसांनी अटक केली. तपासात ते दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अशाच इतर गुन्ह्यांची नोंद आहे. या दोघांनाही यापूर्वी खार पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या