🌟पुर्णा तालुक्यातील श्रीक्षेत्र टाकळीतील सोहळ्यास भाविकांचा प्रतिसाद उद्या दि.१३ जानेवारी भागवतकथा व यज्ञाची सांगता...!


🌟भागवतभूषण ज्योतिषाचार्य पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांच्या सुमधुर वाणीतून सुरू🌟

पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील श्रीक्षेत्र धनगर टाकळी येथे आयोजित भागवतभूषण ज्योतिषाचार्य पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांच्या सुमधुर वाणीतून सुरू असलेल्या सुश्राव्य भागवतकथा ज्ञानयज्ञासह नाम संकीर्तन,लक्ष्मीनारायण यज्ञ व अन्य उपक्रमांना भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभत असून उद्या सोमवार दि.१३ जानेवारी २०२५ रोजी भागवतकथा व यज्ञाची सांगता होत आहे .

श्रीसद्गुरु दाजीमहाराज जन्मोत्सव व सच्चिदानंद वेद स्वाध्याय प्रतिष्ठानचा रौप्य महोत्सव  निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन येथे करण्यात आले आहे. पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी भागवत कथा ज्ञानयज्ञात प्रारंभी श्रीमद् भागवत ग्रंथाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. त्यानंतर घटनाक्रमानुसारच्या कथा, निरनिराळ्या व्यक्तिमत्त्वांचे विशेष, कथांचा अन्वयार्थ उलगडून सांगितला. काही घटनांचा वर्तमानस्थितीशी असणारा संबंध व सद्यस्थितीत सुधारणात्मक उपाययोजनावरही त्यांनी भाष्य केले.

" भगवान परमात्मा अपार सहनशीलता व निर्मळ मनाच्या साधुसंतांच्या प्रेमात पडतात. म्हणून जीवनात आपण सत्पुरुषांच्या, संतांच्या संगतीत राहिले पाहिजे. सत्संग नसेल तर मनुष्याच्या अंगी विवेक जागृत होणार नाही आणि त्याशिवाय ईशकृपाही होणार नाही. ज्ञानयोग, कर्मयोग व भक्तीयोग  हे भगवंताकडे जाण्याचे  तीन मार्ग असून ज्ञानयोगामुळे अहंकार उद्भवू नये तर कर्मयोगाची दीक्षा परिश्रमपूर्वक अंगीकारली पाहिजे. प्रत्येक मानवामध्ये देव पाहण्याची शिकवण भक्तीयोग देतो. नवविधा भक्तीने अधिक सुलभता आणली आहे. आत्मनिवेदनभक्ती अर्थात समर्पण ही एकमेवाद्वितीय भक्ती होय. राष्ट्र व समाजासाठी सेवा व संस्कारयुक्त समर्पण भावनेने सर्वांनी कार्य करण्याची गरज आहे. वर्तमानात भागवत ग्रंथाची हीच फलश्रुती होय. " असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला .

दरम्यान, या सोहळ्यात लक्ष्मीनारायण पंचायतन पंचकुंडी महायज्ञ सुरू आहे. विविध यजमान त्यात सहभागी झाले आहेत. याशिवाय दुर्वासहस्रार्चन,  तुलसीसहस्रार्चन, बिल्वसहस्रार्चन कुंकुमार्चन सेवाही महिला भाविकांनी ईशचरणी समर्पित केली नामसंकीर्तनसेवेत ह.भ.प. महेश महाराज वाढवणकर, ह. भ.प. उमेश महाराज दशरथे ( आळंदी ), जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे ह. भ. प. उल्हास महाराज सूर्यवंशी (आळंदी), प्रज्ञाचक्षू ह.भ. प. मुकुंदकाका जाटदेवळेकर (पाथर्डी) यांनी सांप्रदायिक कीर्तनसेवा तर पुण्याच्या कीर्तन रत्न ह.भ.प. रोहिणीताई परांजपे यांनी संत श्री एकनाथ महाराजांच्या चरित्रावरआधारित नारदीय कीर्तनसेवा सादर केली. श्री नागेश आडगावकर यांचा ' अभंगवाणी ' हा संगीत विषयक कार्यक्रमही झाला सोहळ्याच्या कालावधीत हंपीपिठाचे श्रीमद् जगद्गुरु श्री शंकराचार्य हम्पी विरूपाक्ष (कर्नाटक), विश्वविख्यात  पंडितप्रवर वैदिक श्री. गणेश्वर शास्त्री द्रविड ( काशी ) यांची श्रद्धेय उपस्थिती लाभली. ह.भ. प. भगवान महाराज शेंद्रीकर, ह.भ. प. कैलासबुवा खरे, ह.भ.प. नारायण महाराज पांचाळ टाकळीकर आदी कथा श्रवण प्रसंगी उपस्थित होते.

 या सोहळ्यास आमदार बालाजीराव कल्याणकर,माजी खासदार श्री.तुकाराम रेंगे पाटील,माजी आमदार श्री.विजयराव गव्हाणे,दैनिक ' दिलासा 'चे संपादक संतोष धारासुरकर,शिक्षण संचालक डॉ.महेश पालकर (पुणे),शिक्षणाधिकारी श्री. दिलीप बनसोडे,शिक्षणाधिकारी श्री.प्रशांत डिग्रसकर, शिक्षणाधिकारी माधवराव सलगर ,संभाजीराव धुळगुंडे, विहिपचे श्री.अनंत पांडे,सुरेंद्र शहाणे,राजकुमार भांबरे,मनोज काबरा , वसमतचे सीताराम मॅनेवार,गणेश काळे, बाळकृष्ण कापरे आदींनी भेटी दिल्या.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या