🌟बिड जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल ; वाल्मीक कराडने जामिन अर्जही घेतला मागे🌟
बिड :- बिड जिल्ह्यातील आवादा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी प्रकरणी सुरुवातीला आणि नंतर केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संघटीत गुन्हेगारी कायदा (मकोका) अंतर्गत एसआयटीने चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर चौकशीअंती न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या आरोपी वाल्मिक कराड याची रात्री अचानक तब्येत बिघडली. त्याच्यावर बिड जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सध्या उपचार सुरु आहेत.दरम्यान आज गुरुवार दि.२३ जानेवारी रोजी अचानक वाल्मिक कराडच्या वतीने न्यायालयात दाखल करण्यात आलेला जामिन अर्ज वापस घेण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
बिड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग परिसरात पवन उर्जा निर्मिती क्षेत्रातील आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन कोटीची लाच मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड व इतरांवर गुन्हा दाखल झाला होता परंतु पोलीसांनी त्यावेळी कोणतीही कारवाई केली नव्हती. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर १७-१८ दिवस फरार असलेल्या वाल्मिक कराडने सीआयडीच्या पुणे मुख्यालयात आत्मसमर्पण केले होते. याप्रकरणातील त्याची पोलीस कोठडी संपताच एसआयटीने त्याला संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक केली. न्यायालयाने सध्या वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याची सुनावणी आज होणार होती.
या दरम्यान काल रात्री कराडच्या पोटात दुखत असल्याने त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अधिकच खालावल्याने शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. कराड याला पोटदुखीचा त्रास होत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान कराडच्या खंडणी प्रकरणात दाखल केलेल्या जामीन जामिन अर्जावर न्यायालयात आज सुनावणी होणार होती. मात्र जामीन अर्ज मागे घेतल्यामुळे ही सुनावणी होऊ शकलेली नाही. या प्रकरणात तपास यंत्रणेकडून चार्जशीट दाखल केल्यानंतर पुन्हा एकदा जामीन अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली......
0 टिप्पण्या