🌟उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज मधील महाकुंभ मेळ्याच्या पहिल्याच दिवशी ०१ कोटी ५० लाख भाविकांनी केले स्नान....!

🕉️प्रयागराज मधील महाकुंभ मेळ्यात जर्मनी ब्राझील रशियासह २० देशांतून भाविक दाखल🕉️ 


प्रयागराज : उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज महाकुंभमेळ्याला पौष पौर्णिमेच्या दिवशी काल सोमवार दि.१३ जानेवारी २०२५ रोजी सुरुवात झाली महाकुंभ मेळ्यात पहिल्याच दिवशी जवळपास ०१ कोटी ५० लाख भाविकांनी पवित्र अशा त्रिवेणी संगमात धार्मिक स्नान केले.

प्रयागराज मधील महाकुंभ मेळ्यात जर्मनी ब्राझील रशियासह २० देशांतून भाविक दाखल झाले आहेत काल सोमवारपासून भाविक ४५ दिवसांच्या कल्पवासाला सुरुवात करणार आहेत ॲपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स यासुद्धा महाकुंभासाठी प्रयागराजमध्ये दाखल झाल्या असून त्यांनी निरंजनी आखाड्यात विधी केला तसेच त्या कल्पवासही करणार आहेत. महाकुंभमेळ्याला सोमवारी पौष पौर्णिमेच्या स्नानाने सुरुवात झाली असून दर १२ वर्षांनी होणारा महाकुंभमेळा २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी संपेल.पौष पौर्णिमेला गंगेत स्नान करण्याचे महत्त्व स्पष्ट करताना, तीर्थयात्री पुजारी राजेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, “पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या १५व्या दिवशी म्हणजेच पौष पौर्णिमेला गंगेत स्नान केल्याने सर्व प्रकारचे पाप धुवून जातात. महिनाभर चालणाऱ्या कल्पवासाची सुरुवातही पौष पौर्णिमेने झाली. या काळात लोक महिनाभर दिवसातून तीन वेळा गंगेत स्नान करून परमेश्वराची प्रार्थना करतात."

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, "पौष पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर संगमात स्नान करण्याचा मान मिळालेल्या सर्व संत,कल्पवासी,भक्तांना हार्दिक शुभेच्छा. महाकुंभ हे भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठेचे प्रतीक आहे. पहिल्या स्नान महोत्सवानिमित्त दीड कोटी सनातन भक्तांनी अखंड आणि स्वच्छ त्रिवेणीत स्नान करण्याचा पवित्र लाभ घेतला. 'पहिले स्नान महोत्सव' यशस्वी करण्यासाठी महाकुंभमेळा प्रशासन, प्रयागराज प्रशासन, उत्तर प्रदेश पोलीस, प्रयागराज महानगरपालिका, स्वच्छाग्रही, गंगा सेवा दूत, कुंभ मदतनीस, धार्मिक-सामाजिक संस्था, विविध स्वयंसेवी संस्था आणि माध्यम जगताने सहभाग घेतला."

💫महाकुंभ मेळ्यात हेलिकॉप्टरमधून संतांसह भक्तांवर आज २० क्विंटल फुलांचा वर्षाव करणार💐

महाकुंभनिमित्त गंगा, यमुना व विलुप्त सरस्वती नदीच्या पवित्र संगमावर स्नान करण्यासाठी जगभरातून लोक येत असतात. दर तासाला जवळपास २ लाख भाविक त्रिवेणी संगमात स्नान करत असल्याची आकडेवारी उत्तर प्रदेश प्रशासनाने जारी केली आहे. महाकुंभाच्या मुख्य स्नान आणि मकर संक्रांतीच्या दिवशी हेलिकॉप्टरमधून संत आणि भक्तांवर २० क्विंटल फुलांचा वर्षाव केला जाईल......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या