🌟परभणी येथील कृषि विज्ञान केंद्रात सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्य महिला मेळावा संपन्न....!


🌟कृषि विज्ञान केंद्रातील वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले मेळाव्याचे आयोजन🌟

परभणी :- भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली पुरस्कृत व जीवन ज्योत चॅरिटेबल ट्रस्ट परभणी संचलीत कृषि विज्ञान केंद्रात सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्य दि.०३ जानेवारी २०२४ रोजी अन्नप्रक्रिया उद्योगाद्वारे रोजगार निर्मिती या विषयावर महिला शेतकरी मेळाव्याचे आयोजन परभणी कृषि विज्ञान केंद्रातील वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती लक्ष्मीताई अशोकराव देशमुख, अध्यक्षा, जीवन ज्योत चॅरिटेबल ट्रस्ट, परभणी तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन मा. श्री. दादा लाड, प्रांत संघटन मंत्री तथा अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य, भारतीय किसान संघ हे लाभले होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन मा. डॉ. भगवान आसेवार, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता (कृषि) वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी हे उपस्थित होते. त्याच प्रमाणे मा. श्री. आर. बी. हरणे, उपविभागीय कृषि अधिकारी, परभणी, मा. डॉ. डी. एम. शेरे, प्राचार्य, राजीव गांधी अन्नतंत्र महाविद्यालय, परभणी आणि मा. डॉ. डी. बी. पवार, प्राचार्या, राजीव गांधी कृषि महाविद्यालय, परभणी यांनी विशेष अतिथी म्हणुन उपस्थिती होती. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणुन नांदेड येथील श्री ऑरगॅनिक एक्सपोर्टच्या संचालिका सौ. मंजुषा गुलाबराव पावडे आणि श्री. गुलाबराव आनंदराव पावडे हे लाभले होते.

डॉ. प्रशांत भोसले यांनी आपल्या प्रस्तावनापर मार्गदर्शनात महिलांनी शेतीला अन्नप्रक्रिया उद्योगाची जोड देऊन आर्थिक उन्नती करण्याचे आवाहन केले. श्री दादा लाड यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये महिला शेतकऱ्यांना कापूस पिकाच्या लागवड पध्दती बद्दल सविस्तर माहिती दिली. लागवडीसाठी योग्य अंतर, गळ फांदी काढुन टाकणे, शेंडा खुडुन झाडांची उंची पारंपारीक पध्दतीपेक्षा कमी ठेवुन कशाप्रकारे उत्पादनात वाढ होईल या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. झाडावरील गळ फांदीची ओळख कशी करावी याचे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिका सहित मार्गदर्शन केले. डॉ. भगवान आसेवार यांनी शेतकरी कुटूंबातील निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग वाढवण्याचे अवाहन महिलांना केले. त्याचप्रमाणे शेतीमध्ये येत असलेल्या नवीन तंत्रज्ञानाचे महत्व विषद केले. ग्रामीण भागामध्ये महिलांनी शेतकरी गट स्थापन करुन गावातील विकासामध्ये महिलांचे योगदान वाढवण्याचे आवाहन श्री. आ. बी. हरणे यांनी केले. डॉ. डी. बी. पवार यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शेतकरी कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शेतीपुरक गृहउद्योग व प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी आवाहन केले. या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शीका सौ. मंजुषा गुलाब पावडे यांनी आपला प्रक्रिया उद्योग उभारणीचा पुर्ण जीवनप्रवास उपस्थितांसमोर विषद केला तसेच श्री ऑरगॅनीक एक्सपोर्ट कंपनीद्वारे घेण्यात येणाऱ्या शेवग्याच्या विविध प्रक्रिया उत्पादनांची माहिती सविस्तर सांगीतली.

श्री. गुलाबराव पावडे यांनी महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग सुरु करुन स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे आवाहन केले तसेच प्रक्रिया उद्योगात असणाऱ्या विविध संधी विषद केल्या या दिवशी कृषि विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर महिला शेतकऱ्यांच्या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. अमित तुपे व आभार प्रदर्शन डॉ. अरुणा खरवडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषि विज्ञान केंद्र, परभणी येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विषेश परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी 300 शेतकरी महिला उपस्थित होत्या......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या