🏆नानासाहेब कांडलकर,इफ्तेखार खान आणि अभिषेक वरपे ठरले मानकरी ; ६ जानेवारीला होणार वितरण🏆
✍️ मोहन चौकेकर
चिखली : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्नीत चिखली तालुका पत्रकार संघातर्फे दरवर्षी दर्पण दिनानिमित्त ६ जानेवारी रोजी पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण केले जाते.यंदाच्या पुरस्काराची घोषणा तालुका पत्रकार संघातर्फे करण्यात आली असून पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार २०२४ चे मानकरी जळगाव जामोद येथील लोकमतचे जेष्ठ पत्रकार नानासाहेब कांडलकर हे ठरले आहेत तर शोध पत्रकारिता पुरस्कार चिखली येथील साप्ताहिक विदर्भ का कासीदचे संपादक इफ्तेखार खान आणि नवपत्रकारिता पुरस्कार दैनिक महाभूमीचे बुलढाणा प्रतिनिधी अभिषेक वरपे यांना जाहीर करण्यात आला आहे.
चिखली तालुका पत्रकार संघातर्फे दि. ६ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वाजता चिखली पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिखली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन फुलझाडे हे राहणार असून आ. श्वेताताई महाले यांच्या हस्ते पत्रकारिता पुरस्काराचे वितरण करण्यात येईल. याप्रसंगी तहसीलदार संतोष काकडे, नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधव पायघन व ठाणेदार संग्राम पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
🏆पुरस्कार विजेत्यांचा अल्पपरिचय🏆
चिखली तालुका पत्रकार संघातर्फे देण्यात येणाऱ्या पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार २०२४ चे मानकरी ठरलेले जळगाव जामोद येथील लोकमतचे जेष्ठ पत्रकार प्रा. नानासाहेब कांडलकर हे मागील ३६ वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सन २०१६ (महाराष्ट्र शासन), बुलढाणा जिल्हा प्रेस कौन्सिल जीवन गौरव पुरस्कार, पंजाबराव देशमुख प्रतिष्ठान जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार, कामगार कल्याण मंडळ पत्रकारिता पुरस्कार, लोकमत विशेष वृत्त पत्रकारिता पुरस्कार, श्रीसंत सखाराम महाराज संस्थान जीवन गौरव पुरस्कार असे विविध सन्मान पत्रकारिता क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना आजवर प्राप्त झाले आहेत. शोध पत्रकारिता पुरस्कार २०२४ विजेते पत्रकार इफ्तेखार खान हे चिखली येथील विदर्भ का कासीद या उर्दू - मराठी साप्ताहिकाचे संपादक असून मागील २० वर्षांपासून ते सक्रिय पत्रकारिता करत आहेत. नवपत्रकारिता पुरस्कार २०२४ जाहीर झालेले अभिषेक वरपे हे युवा पत्रकार असून वृत्तपत्र विद्या पदवीपर्यंत त्यांचे शिक्षण पूर्ण झाले असून, महाभुमी या दैनिकाचे बुलढाणा कार्यालय प्रतिनिधी म्हणून ते कार्यरत आहेत. या तिघांनाही त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाल श्रीफळ व मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.
आद्य मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित या दर्पण दिनाच्या कार्यक्रमासाठी चिखली शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन चिखली तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष भिकू लोळगे, सचिव महेश गोंधणे, कोषाध्यक्ष छोटू कांबळे, सहसचिव रमिज राजा आणि संघटक भरत जोगदंडे यांनी केले आहे......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या