🌟नामदेव ढसाळ यांचे आंबेडकरी समाज रात्री दोन दोन वाजेपर्यंत भाषण ऐकण्यासाठी सभास्थानी ताटकळत बसत होता🌟
✍️लेखक:- अरुण निकम
ह्या क्षणी मला "शोले" चित्रपटातील ए.के.हंगल ह्यांच्या "इतना सन्नाटा क्यों है भाई" ह्या डायलॉगची प्रकर्षाने आठवण झाली. ज्या नामदेव ढसाळांनी आंबेडकरी चळवळ, रिपब्लिकन पक्षाच्या वेगवेगळ्या गटाच्या राजकारणापायी विखुरल्यामुळे, मृतप्राय अवस्थेत असताना, दलितांवरील अन्याय, अत्याचारांच्या घटनांनी चरम सीमा गाठल्याच्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीत "दलीत पँथर" नावाची आंबेडकरी विचारांनी भारलेल्या तरुणांची लढाऊ संघटना स्थापन केली. त्या माध्यामातून प्रस्थापितांना टक्कर देत , अन्याय अत्याचाराच्या विरोधात, घटना घडलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन उग्र आंदोलने करीत, प्रसंगी पोलिसांचा मार सहन केला. ह्या बंडखोरीमुळे ज्यांच्यावर अनेक केसेस दाखल केल्या गेल्या. ज्यांनी मरगळलेल्या समस्त आंबेडकरी समाजात, संघर्षाची नवसंजीवनी फुंकून,अन्याय अत्याचारा विरोधात लढण्याचे स्फुल्लिंग पेटवून जान आणली,ज्यांचे शब्द कानात साठवण्यासाठी आंबेडकरी समाज रात्री दोन दोन वाजेपर्यंत भाषण ऐकण्यासाठी सभास्थानी ताटकळत बसत होता, ज्याने लाखोंच्या संख्येने मोर्चे काढून सरकारवर दबाव आणून मागण्या मान्य करण्यास भाग पाडले, ज्याने "गोलपिठा" ह्या काव्यसंग्रहातून कवितेची मळकट वाट बदलून बोलीभाषेतील त्याज्य शब्द त्याच्या अर्था संदर्भासह कवितेत चपखल बसू शकतात हे सिद्ध केले, ज्याने त्या काळात आईचा महिमा अधोरेखित करण्यासाठी " नामदेव साळूबाई ढसाळ" असे नामाभिधान धारण केले, ज्याला चळवळीतील कार्यकर्त्यांनी "साहेब" म्हंटले म्हणजे इंगळी डसल्यासारखे वाटायचे, आणि नामदेव किंवा नाम्या म्हंटल्यावर समाधान वाटायचे, (आम्ही मात्र त्यांना "दादा " म्हणायचो.) अशा आणि ईतर कितीतरी अशक्य गोष्टी ज्याने लीलया करून दाखविल्या, त्या एकेकाळी समस्त आंबेडकरी व पुरोगामी चळवळीच्या गळ्यातील ताईत असलेल्या लाडक्या नामदेवच्या स्मृतिदिनी इतकी शांतता कशी? त्यानिमित्ताने दादरच्या कल्चरल हॉल मध्ये सुमेध जाधव व डॉ. स्वप्निल ढसाळ ह्यांनी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याव्यतिरिक्त कुठेही अभिवादनासाठी कार्यक्रम आयोजित केलेले दिसले नाही. दादांना जावून जेमतेम दहा अकरा वर्षे झालीत. इतक्या अल्प काळात समाज दादांना विसरला की काय? ह्या विचारानेच पोटात गोळा येतो. . म्हणुन मी दादांच्या स्मृतीला अभिवादन करीत असतांना एकूणच आंबेडकरी चळवळी बाबत खेद व्यक्त करतो. बरं, क्षणभर समाजाचे बाजूला राहू द्या. परंतु जे लोक दादांचे बोट धरून
पँथरच्या चळवळीत आले आणि आज पुढारी म्हणुन मिरवतात किंवा सत्तेची चव चाखताहेत, त्यांनादेखील दादांची आठवण येऊ नये यापेक्षा दुर्दैव ते कोणते? असे तर नाही ना की, त्यांची बंडखोरी, अत्याचार्याच्या गळ्याचा घोट घेणारी निडरता, विचार ,चळवळ आताची पिढी विसरली की काय? नक्की काय झाले, आणि काय होत आहे हा एकूणच आंबेडकरी चळवळीच्या दृष्टिकोनातून चिंतनाचा विषय आहे असे मला वाटते. मग प्रश्न असा निर्माण होतो की, ज्या ज्या वेळेला अन्याय, अत्याचाराच्या घटना घडतात, त्यावेळी " आता पँथर असायला हवी होती " असे लोकांना का वाटते? एकूणच आंबेडकरी समाजाने सदविवेक बुद्धिला स्मरून निर्णय घेणे अत्यावश्यक आहे तसेच त्याबरहुकूम पुढील वाटचाल एकोप्याने करणे, ही काळाची गरज आहे.
नामदेव लक्ष्मण ढसाळ ह्यांचा जन्म दिनांक १९/०२/१९४९ रोजी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पुर या गावात झाला. मुंबईत त्यांचे वडील व्यवसायाने खाटीक होते व राहायला गोलपिठा या वेश्यावस्तीतील झोपडपट्टीत होते.तिथेच दादांचे बालपण जाऊन तरुणपणी ते टॅक्सी ड्रायव्हर झाले.साधारण सत्तर बहत्तरच्या दरम्यान दलीत, व महिलांवरील अन्याय अत्याचार चरम सीमेवर पोहोचला होता. माझ्या आठवणीप्रमाणे नाशिकच्या गवई बंधूंचे डोळे काढल्याचे प्रकरण त्याच काळी घडले होते त्यामुळे सकल समाज अस्वस्थ होऊन ढवळून निघाला होता. आतल्याआत धुमसत होता. राजकारण्यांच्या आपाससात लाथाळ्यामुळे समाज सैरभैर होऊन हवालदिल झाला होता. अशा वेळी अमेरिकेतील ब्लॅक पँथरच्या धर्तीवर "दलीत पँथर" ही अतिशय लढाऊ संघटना ज. वी. पवार, भाई संगारे, अर्जुन डांगळे, राजा ढाले ह्यांच्यासह इत्तर सहकार्यांना घेऊन १९७२ साली स्थापन केली.
एखाद्या ठिकाणी दलितांवर,स्त्रियांवर अन्याय, अत्याचाराची घटना घडली की, हे लोक प्रत्यक्ष जाऊन आंदोलन करून प्रशासनाला संबंधित लोकांविरुदध कार्यवाही करण्यास भाग पाडू लागले. त्यामुळे ते अल्पावधीत समाजाच्या गळ्यातले ताईत झाले.त्याकाळी शिवसेनेचा मुंबईमध्ये प्रचंड दरारा असताना, त्यांच्याशी दोन हात करण्याचे धाडस वरळीच्या दंगलीच्या निमित्ताने करून दाखवले.आणि शिवसेनेला टक्कर देणारी देखील ताकद मुंबई, महाराष्ट्रात आहे हे दाखवून दिले.त्यावेळी अर्जुन डांगळे व दादांचा केसाला धरून पोलिस मारीत असल्याचा फोटो वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्याचे माझ्या स्मरणात आहे.नंतरच्या काळात पँथरच्या विस्तार देशभर झाला. परंतु आपण एकसंघ राहणे प्रस्थापितांच्या दृष्टीने धोकादायक आहे म्हणून ते कधीच आपल्याला एकत्र येऊ देत नाहीत.असे माझे ठाम मत आहे. त्यामुळे पुढील काळात पँथरमध्ये फूट पडून एका लढाऊ संघटनेचे तीन तेरा वाजले.
हे सर्व विद्रोही कवि,लेखक माटुंगा लेबर कॅम्पमधील बाबुराव बागुल ह्यांच्या घरी नेहमी येत असत. त्यामुळे आमच्या कायम गाठीभेटी होत. ह्याच लोकांनी प्रस्थापित साहित्य झुगारून "दलीत साहित्य" हा तळागाळातील जीवनशैली अधोरेखित करणारा व प्रस्थापित साहित्यिकांच्या कल्पने पलिकडचा प्रकार साहित्यात आणला. आणि जातीप्रथेमुळे विस्थापित झालेल्या समाजाची ओळख साहित्यातून जगाला करून देण्याची सुरुवात केली दादांनी स्तंभलेखन, कविता, गद्य लेखन ह्या मार्फत विपुल लेखन केले. त्यांच्या "गोलपिठा" ह्या काव्यसंग्रहाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. त्यातील शब्द प्रस्थापितांच्या खाजगीमध्ये देखील उच्चारण्यास वर्ज्य असूनही ,त्यांनी त्या शब्दांना कवितेत जागा देऊन प्रतिष्ठित केले. त्यांचा आणीबाणीच्या काळातला इंदिरा गांधींवर आधारित "प्रियदर्शिनी" हा कवितासंग्रह देखील प्रसिद्ध आहे. त्यांचे , तूही यत्ता कंची (१९८१), मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवला, गांडु बगीचा,आणि इत्तर कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांना सोव्हिएत लेंड नेहरू पुरस्कार, राज्य शासनाचा केशवसुत पुरस्कार,पद्मश्री,साहित्य अकादमी जीवन गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.
माटुंगा लेबर कॅम्प मधील क्रीडा मंडळ ऐक्य समितीच्या अडचणीच्या काळात दादा,अर्जुन डांगळे,व भाई संगारे नेहमी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आम्हाला पाठबळ देत. ज्या वेळी इथे दंगल होऊन एकाची हत्या झाली तेव्हा पहिल्यांदा तशा तणावाच्या परिस्थितीत देखील वाल्मीक मंदिरात जाऊन त्यांच्या प्रमुख लोकांशी बोलण्याचे धाडस दादांनी केले होते. मधुकर तेलोरे व गोरख भिसे ह्यांना मिसाखली अटक करण्यात आली . त्याच्या निषेधार्थ व त्यांची सुटका करावी या मागणी साठी मी व दिनकर देठेनी विधानसभेवर मोर्चा आयोजित केला होता. तेव्हा मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण ह्यांना भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात आमच्या बरोबर एड. निलोफर भगवत व दादा देखील होते. मी दादा बॉम्बे हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्याची बातमी वर्तमानपत्रात वाचली. त्यावेळी मी बडोद्याला जाण्याच्या तयारीत होतो. मी दादांना फोन लावला. त्यावेळी माझा पुतण्या दर्शन हा देखील माझ्या बरोबर होता. त्याच्याशी देखील दादांचे बोलणे करून दिले. मी त्यांना क्षेम कुशल विचारले. दादा म्हणाले की, बऱ्याच दिवसात भेटला नाहीस. एकदा येऊन भेट. मी म्हंटले, नक्की येईन. त्याच्या दोन तीन दिवसानंतर त्यांच्या निधनाची बातमी आली. माझ्या दुर्दैवाने मला अंत्ययात्रेला जाता आले नाही. ही सल मला तहहयात बोचत राहणार आहे.
एवढी मोठी कामगिरी करून देखील त्यांच्या निधनानंतर आपण त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोणत्याही प्रकारे स्मारक उभारण्यास अपयाशी ठरलो आहोंत.असे दुर्दैवाने म्हणावे लागते.दादांचे १५/०१/२०१४ रोजी बॉम्बे हॉस्पिटल येथे मायस्थेनिया ग्रेविस ह्या आजाराने निधन झाले.त्यांचे कायमस्वरूपी स्मारक उभे राहावे. यासाठी मी त्यांच्या सुह्रदयांना, अनुयायांना,समाजाला कळकळीची विनंती करतो.
आज दादांच्या स्मृति प्रीत्यर्थ त्यांना पुन्हा एकदा कोटी कोटी प्रणाम करून हा लेखन प्रपंच संपवतो.....
आपला,
अरुण निकम,
9323249487
दिनांक 18/01/2025.
0 टिप्पण्या