🌟बिड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे संतोष देशमुख हत्ये प्रकरणी वाल्मिक कराडवर देखील मकोका ?


🌟जिल्ह्यातील केज न्यायालयाकडून वाल्मीक कराड यांना न्यायालयीन कोठडी🌟 

🌟परळीत वैजनाथ तालुक्यात प्रचंड तणाव वाल्मीक कराड समर्थकांचे तीव्र आंदोलन🌟


बिड (दि.१४ जानेवारी २०२५) - बिड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील आवादा पवनचक्की कंपनीला ०२ कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला केज न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे त्याचबरोबर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला आता गती आली आहे. दरम्यान वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल होताच त्याचे तीव्र पडसाद आज मंगळवार दि.१४ जानेवारी रोजी परळी वैजनाथ शहरात उमटले परळी वैजनाथ शहरात वाल्मीक कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली असून पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलनाला देखील सुरुवात केली आहे. या आंदोलनात वाल्मिक कराडची आई व पत्नी देखील सहभागी झाले होते. काही ठिकाणी बसेसवर दगडफेक करण्यात आली आहे. शहरात ठिकठिकाणी टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यामुळे परळी शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून पोलीस यंत्रणेकडून सुरक्षेच्या कडक उपाययोजना करण्यात येत आहेत.

बीडमधील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी निघृण हत्या झाली होती. तत्पूर्वी या परिसरात उभारण्यात येणाऱ्या पवनचक्कीचे काम करणाऱ्या आबादा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वाल्मिक कराड व त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलीसांनी कराडला अटक करण्यापूर्वीच याच प्रकरणातून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. या हत्ये प्रकरणी एका आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले होते. इतर सर्व आरोपी पोलीसांना चकवा देवून फरार होण्यात यशस्वी झाले होते. खंडणी व हत्या प्रकरणातील आरोपी दीर्घकाळ तपास यंत्रणांच्या हाती लागले नाहीत. २१ दिवसानंतर वाल्मिक कराडने खंडणी प्रकरणात सीबीआयच्या पुणे मुख्यालयात आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर इतर दोघांना पुण्यातून अटक करण्यात आली होती. याप्रकरणातील अजून एक आरोपी अद्यापही फरार आहे. वाल्मिक कराडच्या अटकेनंतर केज न्यायालयाने त्याला दहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह इतरांबर मकोका लावावा अशी मागणी करण्यात येत होती. आज बाल्मीक कराडची सीआयडी कोठडी संपली होती. त्यामुळे आज वाल्मीक कराडला पुन्हा केज कोर्टात हजर करण्यात आले होते. केज न्यायालयाने वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुणावली आहे.

परळी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाल्मिक कराड समर्थकांनी सकाळपासून आक्रमक भूमिका घेतली असून, परळी शहरात अचानक बंदची हाक देण्यात आली आहे. काही भागांमध्ये बसवर दगडफेक करण्यात आली असून, यामुळे परिस्थिती आणखीनच बिघडली आहे. शहरात तणावपूर्ण वातावरण असून, पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परळीत कराड समर्थकांनी सकाळपासून निदर्शन सुरू केली आहेत. संतापलेल्या समर्थकांनी टायर पेटवून आपला रोष व्यक्त केला आहे. याचदरम्यान, एका महिलेने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने वातावरण अधिकच तापले. कराडच्या ७५ वर्षीय आई आणि पत्नीनेही या निदर्शनांमध्ये भाग घेतला आहे. कराड समर्थकांनी परळीत आ. सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात रोष व्यक्त केला. त्यांच्या पोस्टरवर चप्पल मारत निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच काही ठिकाणी टायर पेटवण्याचे प्रकार घडले असून, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने टायर विझवले. बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू असतानाही आंदोलने सुरू असल्याचे दिसत आहे. परिस्थिती अधिक बिघडू नये म्हणून पोलिसांनी उपाययोजना केल्या आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या