🌟बुलढाण्यात पत्रकार दिनीच पत्रकारावर जिवघेणा हल्ला......!


🌟बांधकामाचे साहित्य टाकून रस्ता अडविणाऱ्यास जाब विचारणे पत्रकार प्रेम कुमार राठोड यांना पडले महागात🌟 

बुलढाणा : मागील काही महिन्यांपासून गल्लीत येणाऱ्या रस्त्यावर बांधकामाचे साहित्य टाकून रस्ता अडविणाऱ्यास जाब विचारणे एका पत्रकारास जीवावर बेतले. येथील गोडबोले लेआउट मध्ये राहणारे शासनमान्य साप्ताहिक विदर्भप्रेमचे संपादक प्रेम कुमार राठोड यांना त्यांच्याच  मोहल्ल्यातील आरोपी गणेश प्रल्हाद बुधवत ने रस्त्यावर अडवून बेदम मारहाण केली. पत्रकार राठोड सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू भर्ती असून त्यांची तब्येत आता स्थिर आहे. भर्ती असलेल्या राठोड यांनी पत्रकारांना सांगितले की, आज पत्रकार दिनाचा कार्यक्रम संपवून ते जेव्हा  दुपारी 1:00 वाजेच्या दरम्यान घरी आले, तेव्हा बुधवत यांनी रस्त्यावर टाकलेल्या बांधकाम साहित्यामुळे त्यांना घरापर्यंत गाडी नेणे मुश्किल झाले होते. 

यापूर्वीही कित्येकदा राठोड आणि गल्लीतील अनेकांनी बुधवत यांना सदर साहित्य हटवण्याबाबत विनंती केली होती. आज पुन्हा एकदा राठोड यांनी बुधवताना विचारणा केली. जर आपण सदर साहित्य हटविले नाही तर मला नाईलाजास्तव लोकाग्रहास्तव वृत्त छापावे लागेल, असे राठोड यांनी सांगताच आरोपी गणेश बुधवत याने प्रेमकुमार राठोड यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी बुधवत यांचे कुटुंबीयसुद्धा राठोड यांना शिवीगाळ करीत मारहाण करीत होते. यात राठोड यांच्या दोन्ही हातांना, छातीला दुखापत झाली. राठोड सध्या बुलढाणा जिल्हा रुग्णालयातील आयसीयू मध्ये भर्ती आहेत. दरम्यान याप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यानुसार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी बुलढाण्यातील पत्रकारांनी केली आहे

मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, डिजिटल मिडिया परिषदेने या हल्ल्याचा निषेध केला आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या