🌟छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेना उबाठा पक्षाच्या ३५ पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे....!


🌟राजिनामा देणाऱ्यांमध्ये शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांच्यासह तब्बल ३५ स्थानिक नेत्यांचा समावेश🌟

छत्रपती संभाजीनगर :- महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर शिवसेना (उबाठा) पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढतांना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगर येथील महानगर पालिकेच्या माजी महापौरांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आज मंगळवार दि.२१ जानेवारी रोजी पुन्हा शिवसेना (उबाठा) पक्षाचे छत्रपती संभाजीनगर येथील शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांच्यासह तब्बल ३५ स्थानिक नेत्यांनी प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे दिले यामध्ये माजी नगरसेवक आणि शिवसेना आणि युवासेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

विश्वनाथ स्वामी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित राजीनामा सादर केला आहे. हे सर्व पदाधिकारी मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाचे अनेक स्थानिक नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. मराठवाड्यात पक्षात मोठी गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच संभाजीनगचे माजी महापौर नंदकुमार घोडले यांनी शिवसेना शिंदे सेनेत प्रवेश केला. नुकताच पक्षाचे मराठवाडा विभाग सचिव अशोक पटवर्धन यांनीही शिवसेना शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला. संभाजीनगरमध्ये माजी खा. चंद्रकांत खैरे आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातील गटाबाजी विरोधात पक्षप्रमुखांकडे पदाधिकाऱ्यांनी खदखद व्यक्त केली होती. त्यानंतर यापुढे कोणीही शिवसेना सोडणार नाही असा दावा केला होता मात्र आज ३५ पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे हा दावा फोल ठरला. महानगरपालिका निवडणुकीपूर्वी नेते पदाधिकाऱ्यांनी पक्षाला केलेला जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंसाठी चिंता वाढवणारा आहे. शिवसेना राज्य संघटक एकनाथ पवार यांनी काल (दि. २० जानेवारी) रोजी राजीनामा दिला. त्यांनी पक्षाकडून लोहा-कँधार मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात असून ते शिवसेनेत प्रवेश करणार असा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी केला आहे. १० ते १५ आमदार शिवसेनेत प्रवेश करतील असेही त्यांनी सांगितले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या