🌟धनंजय मुंडे जोपर्यंत दोषी ठरत नाहीत तो पर्यंत राजीनामा घेणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : महाराष्ट्र राज्यासह देशात देखील खळबळ माजवलेल्या बिड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच स्व.संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राजकीय क्षेत्रात अक्षरशः गदारोळ माजवल्याचे दिसत असून या अमानुष हत्याकांडामुळे संपूर्ण राज्यात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे भारतीय जनता पार्टीचे आ. सुरेश धस राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात अत्यंत गंभीर अशा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावरून काढा अशी सातत्याने ते मागणी करत असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे.
जोपर्यंत अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावा सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. न्यायालयीन चौकशी, एसआयटी व सीआयडी चौकशी होईपर्यंत कारवाई केली जाणार नाही. तिन्ही चौकशीमध्ये जो दोषी असेल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडे यांच्या राजीनाम्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान मला मंत्री व्हायचं आहे म्हणून कुणाचातरी राजीनामा घ्यावा हे माझ्या मनातही नाही. धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जातो आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की पूर्ण चौकशी झाली की आका, काका सगळ्यांवर कारवाई करु. त्याआधीच धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागितला जातो आहे ? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे.
राजीनाम्याच्या विषयावर कसलीच चर्चा झालेली नाही. कुणी काय आरोप करावेत, हे लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे. माझे म्हणणं आहे की ट्रायल कोर्टात होऊ द्या. तपास यंत्रणा काम करत आहे. फेक नॅरेटिव्ह तयार केला जात आहे, असा आरोप अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी केला. ते आज (दि. ६) पत्रकारांशी बोलत होते. मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सुमारे तासभर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण दिले.
💫राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षाने रान उठविले :-
मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षाने चांगले रान उठविले आहे. विरोधी पक्षाने राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेऊन मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर माजी खासदार संभाजीराजे यांनी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. दरम्यान, मुंडे यांनी आज उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, मुंडे यांनी राजीनाम्याच्या विषयावर चर्चाच झाली नसल्याचे सांगितले.
💫अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट :-
बीड सरपंच हत्याकांड प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यात आज मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची आज भेट घेतली. बीड प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. मंत्रालयात दुपारी झालेल्या या भेटीनंतर रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सागर बंगल्यावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे कळू शकले नाही. मात्र त्यानंतर अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचीही मुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्यावर भेट झाली. त्यामध्ये धनंजय मुंडे यांनी सध्या राजीनामा देण्याची गरज नाही. आरोप सिध्द झाल्यावर निर्णय घेता येईल अशी चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.......
0 टिप्पण्या