🌟परभणीतील भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी आणि लोकनेते विजय वाकोडे ह्यांचे बलिदान वाया जाऊ देऊ नका....!


🌟सोमनाथ सुर्यवंशीच्या शव चिकित्सा अहवालात त्याचा 'मृत्यू मारहाणीने झाल्याचे स्पष्ट🌟

✍️अरुण निकम

परभणीत बांगला देशातील हिंदु धर्मियांवर होणार्‍या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदु संघटनांनी दि.10 डिसेंबर 2024 रोजी परभणी जिल्हाधिकारी व परभणी जिल्हा पोलिस अधिक्षक ह्यांच्या कार्यालयावर  मोर्चा आयोजित केला होता. त्यावेळी ह्या जातीयवादी संघटनेच्या नेत्यांनी हकनाक संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात विखारी भाषणबाजी केली. त्याचा परिणाम असा झाला की, त्यांचा मोर्चा विसर्जित झाल्यानंतर  सायंकाळी 4 ते 5 वाजे दरम्यान सोपान दत्तात्रय पवार नावाच्या मूर्ख माणसाने परभणी शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर  बॉक्समध्ये असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीच्या काचांची दगड फेकून नासधूस केली. ते पाहिल्यानंतर आंबेडकरी अनुयायांनी त्याला पकडून चांगला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.  ही बातमी शहरांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यावर प्रतिक्रिया उमटून आंबेडकरी समाजामध्ये संतापाची लाट उसळली. ह्या घटनेच्या निषेधार्थ सर्व आंबेडकरी संघटनांनी बुधवार दि.11 डिसेंबर 2024 रोजी 'परभणी बंद' ची हाक दिली त्या वेळेस काही संधीसाधू गुंड प्रवृत्तीच्या  लोकांनी घुसखोरी करून ह्याचा गैरफायदा घेत दंगल, लूटमार,जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला. 

त्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला.अश्रूधुराच्या नळकांड्या   फोडल्या. त्यावेळी अनेक निरपराध लोकांना पोलिसांचा  मार सहन करावा लागला. तेवढ्याने पोलिसांचे समाधान झाले नाही. त्यांचा राग इतका अनावर झाला होता की, बाबासाहेबांची सही असलेल्या किंवा निळा झेंडा लावलेल्या वाहनांची देखील मोडतोड केली. त्याचा विडिओ सगळ्या देशाने पाहिला आहे. ह्या संविधान सन्मान आंदोलनात आंबेडकरी नेते विजय वाकोडे हे शरीर स्वास्थ्य नसतांनाही सहभागी झाले होते. त्यांना हा अमानुष अत्याचार सहन झाला नाही. त्यामुळे ते बेचैन होऊन अस्वस्थ झाले. त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन  दुःखद निधन झाले. ह्यावरूनच पोलिसांच्या निर्दयतेची

कल्पना येऊ शकते.  खरे तर मी या ठिकाणी अशी मागणी करतो की, सोमनाथच्या मारहाणीची सरकारच्या मर्जीतील निवृत्त न्यायाधीशा मार्फत चौकशी न करता, त्यासाठी स्वतंत्र आयोग नेमून त्यावर निवृत्त न्यायाधीशांसह आंबेडकरी संघटनेतील निरपेक्षपणे काम करणार्‍या लोकांची नेमणूक करावी. जेणेकरून निःपक्षपातीपणे आयोग काम करेल. त्याबरोबरच विजय वाकोडे साहेबांच्या मृत्यूची देखील त्याच आयोगामार्फत  चौकशी होऊन दोन्ही प्रकरणातील गुन्हेगारांना कडक शिक्षा झाली पाहिजे.  तरच सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे साहेब ह्यांना न्याय मिळेल. मुळातच ह्या जातीयवादी सरकारला डॉ. बाबासाहेबांविषयी असूया आहे. त्यांची भूमिका कायम " मुख मे राम, बगल मे छुरी" अशा प्रकारची राहिली आहे. ते फक्त मतलबासाठी तोंडदेखले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन गुणगान करतात परंतु त्यांच्या देशभरातील केंद्र किंवा राज्य सरकारांच्या प्रत्यक्ष  कृतीतून बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानातील धर्मनिरपेक्षता, समता, स्वातंत्र्य, आणि अन्य अधिकारांची सातत्याने पायमल्ली केली जात असल्याचे गंभीर चित्र सर्वत्र दिसत आहे.त्यांनी महाराष्ट्रात तर मुस्लिमांसह बौद्धांना टार्गेट केल्याचे गंभीर चित्र दिसते. त्यामुळे आंबेडकरी समाजाला त्रास देण्याचे काम सातत्याने सुरू आहे.        

हा प्रकार  घडल्यानंतर पोलिसांनी रात्रीच्या प्रहरी  आंबेडकरी वस्त्यांमध्ये कोंबिंग ऑपरेशन करून घराघरात घुसून स्त्रिया, तरुण, म्हातार्‍या लोकांना अमानुष मारहाण करीत कित्येक निरपराध लोकांना अटक करून पोलीस कस्टडीत डांबले. तिथे देखील त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आली. अशा निरपराध लोकांमध्ये सोमनाथ सूर्यवंशी हा शिक्षणासाठी परभणीत आलेला, कायद्याच्या तिसर्‍या वर्षाचा अभ्यास करणारा तरुण पोलिसांच्या कचाट्यात सापडला. त्याचा ह्या दंगलीशी किंवा लुटमारीशी काहीही संबंध नव्हता. परंतु तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी असल्यामुळे त्याला अटक करून पोलीस कस्टडीमध्ये त्याच्यावर अनन्वित अत्याचार करून जबरी मारहाण करण्यात आली. त्यात त्याचा दिनांक 15 डिसेंबर रोजी मृत्यू झाला. त्याच्या शवविच्छेदन अहवालात "मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे"  स्पष्ट नमूद केले आहे. इथे एक मुद्दा राहून जाऊ नये म्हणुन त्याचा उल्लेख करतो.  संविधानाच्या सन्मानासाठी ज्या  सोपान पवारच्या कृत्यामुळे आंदोलन झाले. त्याची कसल्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी न करता, दुसर्‍याच दिवशी  "माथेफिरू" "असल्याचे कोणत्या निकषावर जाहीर केले ?. त्याला "माथेफिरू" ठरवून जाहीर करण्याची पोलिसांनी इतकी घाई का केली ? आणि यामागे त्यांचा काय हेतू होता? मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस ह्यांनी तर कहरच केला. ह्याविषयी विधानसभेत उत्तर देतांना सोमनाथ सूर्यवंशी ह्याचा मृत्यू 'अस्थमा मुळे' झाल्याची घोषणा केली त्याच्या शव चिकित्सा अहवालात त्याचा 'मृत्यू मारहाणीने झाला" असल्याचे स्पष्ट नमूद असतांना, त्यांनी कोणत्या आधारावर असे घोषित केले ?. हे समजायला मार्ग नाही. 

ह्या घटनेनंतर राहुल गांधी, शरद पवार, रामदास आठवले, चंद्रशेखर आझाद आणि अन्य नेत्यांनी सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेतली. प्रत्येकाने गुन्हेगारांना कडक शिक्षेची मागणी केली ह्या आंदोलनाची व्याप्ती वाढत असलेली पाहून, त्याची धार बोथट करण्याच्या हेतूने  सरकारकडून दहा लाख रुपयांचा चेक घेऊन सरकारी अधिकारी सोमनाथ सूर्यवंशीच्या घरी गेले. परंतु त्याच्या स्वाभिमानी गरीब आईने आणि इतर कुटुंबियांनी चेक स्विकारण्यास  नकार दिला.  त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना स्पष्टपणे सुनावले की, तुम्हाला जर न्याय द्यायचा असेल तर प्रथम ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सोमनाथला अमानुष मारहाण केली त्याचे हाल हाल करुन मरणासन्न अवस्थेत नेले त्यामुळे त्याचा अकाली मृत्यू झाला. त्यांना ताबडतोब अटक करुन त्यांच्यावर खटला भरा...ह्याला म्हणतात, आंबेडकरी बाणा.....घरात अठरा विश्व दारिद्र्य, गरिबी असतांना एव्हढ्या मोठ्या रकमेचा चेक परत करणे ही साधीसुधी गोष्ट नाही. त्यामुळेच त्यांच्या ह्या स्वाभिमानी कृतीला गरिबीने देखील गहिवरून कडक जयभीम केला असेल. पाच वर्षांतून एकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातुन दिलेला पवित्र मतदानाचा हक्क काही रुपयात विकणाऱ्या बाबांचे अनुयायी म्हणवून घेणार्‍या बेगडी लोकांना ही सणसणीत चपराक आहे. 

              .दरम्यानच्या काळात वेगवेगळ्या स्तरावर आंदोलन सुरूच होते. परंतु दोषींवर कारवाई करण्याबाबत सरकार ढिम्म होते. म्हणुन शेवटचा उपाय ह्या दृष्टीकोनातून विविध आंबेडकरी संघटनांनी परभणी ते मंत्रालय असा लाँग मार्च दिनांक 17/01/2025 पासून सुरू केला. त्याला प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे ह्या सर्व काळामध्ये काही  चांगल्या गोष्टी घडत असल्याचे दिसते. आठवले साहेब केंद्रात मंत्री असून देखील, त्यांनी सूर्यवंशीच्या घरी सांत्वनपर भेट घेऊन, संबंधितावर ताबडतोब कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच मा. अविनाश महातेकर, मा. गौतम सोनवणे, मा.सिद्धार्थ कासारे ह्यानी मोर्चाला पाठींबा असल्याचे जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे बाळासाहेब आंबेडकरांनी पाठींबा तर दिलाच, परंतु ज्या माय माऊलीने सरकारी मदत धुडकावून लावून, आपल्या ताठ कण्याचा आंबेडकरी बाणा दाखवला, तिच्यासाठी आणि कुटुंबासाठी निधी संकलन करण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून त्यांचा स्वाभिमान जपला जाईल.

                हल्ली राजकारणाचे चित्र बदलले आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षात गटबाजी आहे. परंतु ते सर्व लोक समाज म्हणुन किंवा समाजाचे प्रश्न सोडवताना पक्ष, मतभेद विसरून एकत्र येतात. आपल्या आंबेडकरी समाजामध्ये अनेक गट आहेत. त्यांच्यात पराकोटीचे मतभेद आहेत. म्हणुन त्यांनी एकत्रित यावे असे मी म्हणणार नाही.  बाबांच्या आशीर्वादाने ते सर्व एकत्रित आले साखरेहून गोड होईल. मी काही त्यांना सल्ला देण्याइतपत मोठा नाही,  परंतु आपण राजकिय अभिनिवेष बाजूला ठेऊन, सामाजिक प्रश्नांना प्राधान्य देत एकजुटीने काम केल्यास, त्याचा निश्चित चांगला परिणाम दिसेल. ह्याची मला खात्री आहे. आणि आपण सर्व लोक एकत्रित आहोत,ह्याची जाणीव अन्य पक्षांना झाली तर त्यांच्यावर आपला अंकुश राहीलच, परंतु निवडणूक काळात ते आपल्याला गृहीत न धरता,  आपल्याशी प्रथम वाटाघाटी करतील. 

            25 जानेवारीला मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे. आपण सर्व लोकानी त्यात सहभागी होऊन मोर्चा यशस्वी करायचा आहे. बघू या! सरकारकडून त्यातील मागण्यांना किती प्रतिसाद देते?

      हम्म भीम के बच्चे है, 

      फितरत हमारी सच्ची है ,

      न्याय की उम्मीद रखते है, 

      वर्णा, न्याय को हम खिच के ला 

        सकते है, 

       हम भीम के बच्चे है.!

✍️अरुण निकम, 

9323249487.

दिनांक...23/01/2025.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या