🌟सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पत्रकारिता करणे ही निरपेक्ष समाजसेवा होय -- आमदार श्वेताताई महाले


🏆पत्रकार दिनानिमित्त चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीने विविध पुरस्कारांचे झाले वितरण 🏆


✍️ मोहन चौकेकर 

चिखली : समाजातील गोरगरिबांसाठी   कार्य करणे याला समाजसेवा म्हणतात निरपेक्ष वृत्तीने पत्रकार देखील समाजकार्य  करत असतात. दीन दु: खितांच्या  व्यथेला वाचा फोडणे, शासन आणि समाज यांच्यामध्ये दुवा म्हणून कार्य करणे तसेच जनजागृती करून विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान करणे  हे  सामाजिक कार्य  करणाऱ्या पत्रकारांसाठी  माझ्या वतीने जे जे सहकार्य करता येईल ते करण्याची ग्वाही मी या प्रसंगी देत आहे असे प्रतिपादन आमदार श्वेताताई महाले यांनी केले. दि. ६  जानेवारी रोजी चिखली तालुका पत्रकार संघ व पत्रकार कल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात  प्रमुख मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.


पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमांमध्ये पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार, शोध  पत्रकारिता पुरस्कार आणि नव  पत्रकारिता पुरस्कार या पुरस्कारांचे वितरण आमदार श्वेताताई महाले यांच्या हस्ते करण्यात आले. तहसीलदार संतोष काकडे, नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधव पायघन आणि ठाणेदार संग्राम पाटील याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. चिखली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन फुलझाडे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 


दरवर्षी ६  जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी या दिवशी मराठी भाषेतले पहिले वर्तमानपत्र सुरू केले होते हा यामागील संदर्भ आहे. चिखली तालुका पत्रकार संघातर्फे  या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. या कार्यक्रमात पत्रकारिता पुरस्कार देखील दिले जातात. यंदा पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार जळगाव जामोद येथील लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार नानासाहेब कांडलकर यांना, शोध पत्रकारिता पुरस्कार चिखली  येथील साप्ताहिक विदर्भ का कासीदचे  संपादक इफ्तेखार  खान  आणि नव  पत्रकारिता पुरस्कार बुलढाणा येथील महाभुमीचे प्रतिनिधी अभिषेक वरपे यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात दैनिक  समाज  नायकच्या पत्रकार दिन विशेषांकाचे  प्रकाशन  मान्यवरांनी केले. 


💫आमदार श्वेताताईं महालेंनी दिला पत्रकार भवनांचा शब्द :-

समाजातील वंचितांच्या व्यथा मांडणाऱ्या पत्रकारांच्या  देखील काही समस्या असतात. लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्या समजून घेण्याचा प्रयत्न नेहमीच करतो. याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील पत्रकारांकरता हक्काचे व्यासपीठ व त्यांच्या कार्यक्रमासाठी हक्काची जागा उपलब्ध व्हावी या उद्देशाने पत्रकार भवन निर्मितीचा संकल्प याप्रसंगी आ. श्वेताताई महाले यांनी बोलून दाखवला. यासाठी आवश्यक  असलेली कायदेशीर कार्यवाही लवकरात लवकर करून पत्रकार भवणाचा विषय आपण मार्गी लावणार असल्याचा शब्द आ. श्वेताताई  महाले यांनी या कार्यक्रम प्रसंगी दिला. 

            ठाणेदार संग्राम पाटील यांनी आपल्या भाषणातून सर्व शासकीय अधिकाऱ्यांना एकत्रित  एका मंचावर आणल्याबद्दल तालुका पत्रकार संघाचे कौतुक केले. तहसीलदार संतोष काकडे यांनी तालुक्यातील  पत्रकारांची भूमिका ही नेहमीच विकास कार्यासाठी पूरक असल्याचा अभिप्राय व्यक्त केला.  तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन फुलझाडे यांनी  आपल्या अध्यक्षीय  भाषणातून  पत्रकार संघाच्या वाटचालीवर प्रकाश टाकला. पत्रकार संघाच्या विविध उपक्रमांची माहिती कैलास गाडेकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून दिली. पुरस्कार प्राप्त पत्रकार नानासाहेब कांडलकर व अभिषेक वरपे यांनी आपल्या सत्काराला  उत्तर  दिले.  चिखली तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांचा २४  लक्ष रुपयांचा विमा आदर्श अर्बन कॉपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने  संस्थेचे अध्यक्ष विलास भाडाईत  यांच्या पुढाकारातून काढण्यात आला. यानिमित्त संस्थेचे व्यवस्थापक  ज्ञानेश्वर सोळंकी यांचा सत्कार आ. श्वेताताई  महाले  यांच्या हस्ते करण्यात आला. 

           सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुकादास मुळे यांनी केले तर भरत जोगदंड यांनी आभार मानले. याप्रसंगी पत्रकार कल्याण बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संतोष लोखंडे, उपाध्यक्ष कैलास शर्मा, सहसचिव रवींद्र फोलाने, कोषाध्यक्ष कैलास गाडेकर, इफ्तेखार  खान, योगेश शर्मा, तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष भिकू लोळगे, सचिव महेश गोंधणे, सहसचिव रमिज राजा, कोषाध्यक्ष छोटू कांबळे, संघटक भरत जोगदंडे तसेच गणेश सोळंकी, मराठी पत्रकार परिषदेचे बुलढाणा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख  मोहन चौकेकर , कमलाकर खेडेकर, सत्य कुटे, इमरान शहा, सय्यद साहिल, शेख साबीर यांच्यासह  शहर व तालुक्यातील पत्रकार बांधव आणि सामाजिक व राजकीय कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते. १५ दिवसांपूर्वी निधन झालेले पत्रकार संघाचे जेष्ठ सदस्य गिरीश शिरभाते यांना या कार्यक्रमात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सामूहिक राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.....                         

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या