🌟पुर्णा तालुक्यातील श्रीक्षेत्र धनगर टाकळी येथे सद्गुरु दाजी महाराज जन्मोत्सवात बोलताना ते म्हणाले🌟
पूर्णा :- 'फळाची अपेक्षा न करता कार्य करण्याची प्रेरणा भारतीय संस्कृती देते' श्रेष्ठ ऋषिमुनींनी मानवी जीवनाच्या सार्थकतेसाठी कर्मयोगाचे मार्गदर्शन केले. त्यातील अनेक बाबींचे सखोल व समर्पक चिंतन व आचरण होण्याची गरज आहे ,अशी अपेक्षा कर्नाटकातील हम्पीपीठाचे श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य हम्पी विरुपाक्ष यांनी शुक्रवार दि.10 जानेवारी 2025 रोजी व्यक्त केली.
श्रीक्षेत्र धनगर टाकळी येथे सद्गुरु दाजी महाराज जन्मोत्सव व सच्चिदानंद वेद स्वाध्याय प्रतिष्ठानचा रौप्य महोत्सव निमित्ताने आयोजित सोहळ्यात आशीर्वचन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर भागवतभूषण ज्योतिषाचार्य पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी उपस्थित होते.प्रारंभी वेदमूर्ती उमेशमहाराज व सौ अपर्णा टाकळीकर वेदमूर्ती अवधूतमहाराज व सौ अश्विनी टाकळीकर यांच्या हस्ते श्रीमद जगतगुरूंची वैदिक मंत्रघोषात विधिवत पाद्यपूजा झाली. संयोजकांच्या वतीने पुष्पार्चन करून जगदगुरुंना मानवंदना दिली. कुंकुमार्चनही करण्यात आले .
उपस्थित जनसमूहास आशीर्वचन देताना जगद्गुरु म्हणाले की," भारतीय संस्कृतीतील भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांनी मानवी जीवन कसे चालावे यासाठी एक ' मॅन्युअल ' दिले ते म्हणजे 'भगवदगीता ' होय. त्यात मानवी जीवनाला सार्थकता प्राप्त करून देणारा " कर्मण्ये वाधिकारस्ते... " हा श्लोक जीवनाचा मूलमंत्र होय. श्रीकृष्णांनी दुष्कर्म करणाऱ्या कंस, जरासंध, नरकासुर यासह अनेकांचा संहार केला. कौरव पांडव युद्धातही कौरवांना सैन्य दिले तर अर्जुनाचे सारथ्य केले. या कोणत्याही बाबीत यशप्राप्तीनंतर फळाची अपेक्षा केली नाही. ऊक्ती व कृतीत एकवाक्यता ठेवून केवळ निष्काम कर्मयोगाची दीक्षा दिली. हेच तत्व मानवी जीवनात आचरणात आले पाहिजे." सर्वे जना सुखीन: भवन्तु " हा आशीर्वाद त्यातून फलद्रूप होईल, असा विश्वास जगदगुरुंनी व्यक्त केला. भारतीय संस्कृतीतील विविध बाबी व विज्ञान यांचाही सहसंबंध स्पष्ट करीत त्यांनी गंगाजल ,मंत्राभिषेक नामस्मरण इत्यादींचे महत्त्व प्रतिपादित केले. धैर्य, साहस शक्ती व मुक्ती पैशाने मिळत नाही ती केवळ नामस्मरणाने मिळेल, हे त्यांनी स्पष्ट केले.....
---------
💫रक्तदाते बनले जगद्गुरु:-
हंपी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य हंपी विरुपाक्ष यांनी टाकळी येथे चाललेल्या सोहळ्यातील विविध उपक्रमांची माहिती घेतली. आरोग्य शिबिरास भेट दिली.एवढेच नव्हे तर स्वतः रक्तदानही केले. तसेच येथील संतवर्य गंगाजीबापू गोसेवा प्रकल्पाची पाहणी केली. गोसेवेच्या कार्याचा गौरवही केला. गोसेवेचे हे कार्य भारतभर विस्तारित होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली...
0 टिप्पण्या