🌟संत बाबा कुलवंतसिंघजी यांचा जत्थेदार म्हणून २५ वर्षें सेवा पूर्तिचा कृतज्ञनता सोहळा आज दि.२५ जानेवारीला होणार साजरा..!



🌟"यापुढे 'सेवापूर्तिची' पुनरावृत्ति होईल काय ?" मुख्य जत्थेदार पदाचे पंचवीस वर्षाचे कठीण मार्गक्रमण🌟


मी, स्वतःला खूपच भाग्यवान मानतो कारण श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या पावन भूमीत मला आयुष्य व्यतीत करण्याचे भाग्य लाभले आहे. हजुरसाहेब नांदेड येथील शीख सभ्यतेचा मी गेल्या पाच दशकाचा साक्षीदार असल्याचा आविर्भाव आता मला लपवता येणार नाही. तसे शक्य देखील नाही. बालपणा पासून हजुरसाहेब येथील घडामोडी पाहत वाढलो. मनावर झालेले सिक्खी संस्कार अंगीकार करीत धर्म जगलो, परंपरा जगली आणी एक सामाजिक इतिहास जगायला मिळाले. आता या घडीला घडणाऱ्या हजुरसाहेबच्या दिव्यदीपमान सोहळा आणी त्याचे इतिहास देखील माझ्या नजरें देखत घडत गेले म्हणून माझ्या अविर्भावास वाट मोकळी झाली असे म्हणायला हरकत नाही. तख्त सचखंड श्री हजुरसाहेब गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार, संतबाबा कुलवंतसिंघजी यांची जत्थेदार पदावर सेवाअवधि पंचवीस वर्षें पूर्ण होऊन त्याची सेवापूर्ति साजरी होत असल्याचा आजचा हा सुखद असा प्रसंग आहे. संतबाबा कुलवंतसिंघजी यांचा हा दिव्यदीपमान कृतज्ञता सोहळा निश्चितच एक संदेश देऊन जाणार आहे. तसेच भविष्याचा वेध घेण्यासाठी ओढवणार आहे. 

संतबाबा कुलवंतसिंघजी यांना मी, बालपणापासून पाहत आलो आहे. शहीदपुरा भागात बाबाजींचे घर माझ्या आजोळासमोरच होते. बाबाजी ज्यावेळी श्री हजुरसाहेब आयटीआय मध्ये शिकत होते त्यावेळी मी खालसा हायस्कूल मध्ये विद्यार्थी होतो. एका सामान्य आणी गरीब कुटुंबात झालेला बाबाजींचा जिवन संघर्ष कथेचा विषय होय. त्यांचे वडील स्व. बलवंतसिंघजी कडे बनविण्याचे काम करीत होते. बाबाजींचे वय पाच वर्षें असतांना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी घरी वडीलधारी भाऊ स्व. धनवंतसिंघ नऊ वर्षाचे आणी स. हरजीतसिंघ कडेवाले सात वर्षाचे असेल. सवा एक महिन्याचा धाकटा भाऊ. घरी कामावणारा पुरुष कोणीच नाही. आईं माता संतकौर यांनी परिश्रम करून चार मुलांचे पालपोषण केले. एका प्रतिकूल परिस्थितितून संघर्ष करून तखत सचखंड हजुरसाहेब गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार पदी सेवा करण्याची संधी मिळणे खरोखर भाग्यच होय. दि. 13 जानेवारी, सन 2000 रोजी जत्थेदार म्हणून त्यांची नियुक्ति झाली. त्यापूर्वी ते मीत ग्रंथी म्हणून सेवेत रुजू होते. पूर्वीचे जत्थेदार संतबाबा हजुरसिंघजी यांच्या मार्गदर्शनात त्यांना सेवा अंगीकार करण्याची संधी लाभली. दिवंगत संतबाबा हजुरासिंघजी यांनी मुख्य जत्थेदार म्हणून सोळा वर्षें योगदान दिलेले आहे. त्यांच्यापूर्वीचे जत्थेदार संतबाबा जोगिंदरसिंघजी मोनी बाबाजी यांनी देखील मुख्य जत्थेदार म्हणून पंचवीस वर्षें जवाबदारी पाळलेली आहे. त्यामुळे हजुरसाहेबचा एक समृद्ध धार्मिक मार्गक्रमण आहे ज्यास आपण इतिहासाची संज्ञा देऊ शकतो. पण मार्गक्रमण हा शब्द जास्त आत्मीय वाटेल. अगदी कठीण असा हा मार्गक्रमण आहे ज्यावर एकटे चालत राहत वाट शोधावी लागते. त्यामार्गावर रोज चालायचे, वेळोवेळी पण वेळेवर आणी धार्मिक शिष्टाचाराने चालत राहणे हेच जिवन होय. जत्थेदार होणे सोपे नाही. सर्वप्रथम ब्रह्मचार्य पाळणे बंधनकारक होय. दूसरं, व्यक्तिक जिवन जगण्याची बंदी. चोवीस तासात पाच वेळची सेवा. चार तासपेक्षा जास्त निरंतर झोप घेता येत नाही. रात्री दोन वाजता जागे होऊन सेवेत दाखल व्हावे लागते. पहाटे, सकाळ, दुपार, संध्याकाळ आणी रात्री उशिरापर्यंत वेगवेगळ्या पाच सेवा करायचे नियम ठरलेले आहेत. शिवाय सामाजिक जाणीवा अमलात आणाव्या लागतात. असली ही कठीण सेवा (मार्गक्रमण) होय. असल्या शिस्तबद्ध मार्गक्रमणाचे बाबाजी पथिक आणी माझ्या सारखा अवलोकन करणारा एक सामान्य व्यक्ति. हजुरसाहेब नांदेड या पावनभूमीत आमचे आयुष्य म्हणजे एक यात्राच होय. देशातून विदेशातून दर्शनासाठी रोज हजारोंच्या संख्येत भाविक यात्रा करून पोहचतात आणी स्वतःला भाग्यवान मानतात. त्यादृष्टीने येथे राहणारे, वावरणारे किती भाग्यशाली असाव्यात. 

संतबाबा कुलवंतसिंघजी यांनी जो इतिहास घडवला आहे त्याची पुनरावृत्ति भविष्यात खूपच कठीण अशी आहे. त्यांनी सन 2000 ते 2025 पर्यंत जत्थेदार म्हणून एक स्तंभ गाठले. त्याची पुनरावृत्ति करण्यासाठी येत्या काळातील जत्थेदाराला तेवढे मार्गक्रमण करायला पुढे पंचवीस वर्षाचा कालावधि पूर्ण करायला लागेल. संतबाबा कुलवंतसिंघजी यांचा सेवाकाल मे 2027 पर्यंत असल्यामुळे त्या तिथिपासून पुढे नव मार्गक्रमण सुरु होईल. तेव्हा वर्ष 2057 पूर्वी असली पुनरावृत्ति शक्यच नाही. किंवा त्यापेक्षा अधिक काळ प्रतीक्षा करावी लागेल. आज घडीला या इतिहासाचे अवलोकन देखील तेवढेच सार्थक वाटते. शीख समाजाच्या अनुषंगाने सन 1956 पासून सुरु झालेला नांदेडच्या शीख समाजाचा इतिहास काळ काही अर्थाने खूप मौल्यवान असा ठरणार आहे. आज बाबाजींच्या निमित्ताने एका अवलोकनास सामोरे जाण्याची संधी लाभली. बाबाजींना उदंड आयुष्य आणी आरोग्य लाभावे हीच सदिच्छा! 

स. रविंदरसिंघ मोदी, 

वरिष्ठ पत्रकार आणी अभ्याससक.

मो.न. 9420654574

.........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या