🌟न्यायालयाने आरोपी नराधम संजय रॉयला सुनावली मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा🌟
कोलकाता : पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता येथील आर.जी.कर महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर बलात्कार व निर्घृण हत्याकांड प्रकरणातील दोषी नराधम संजय रॉय याला पश्चिम बंगालच्या सियालदाह न्यायालयाने काल सोमवार दि.२० जानेवारी २०२५ रोजी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याबरोबरच न्यायालयाने त्याला ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. रॉय याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आल्याने कोलकाता येथील निर्भयाला न्याय मिळाल्याची भावना जनसामान्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.
कोलकाता येथील आर. जी. कर महाविद्यालय आणि रुग्णालय येथे ९ ऑगस्ट २०२४ रोजी एका डॉक्टरवर बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. रुग्णालयाच्या टाऊन हॉलमध्ये या डॉक्टरचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळला होता. या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. हे क्रौर्य पाहून पोलीस आणि शवविच्छेदन करणारे डॉक्टरही हादरले होते. त्यानंतर पुढील दीड महिना या महाविद्यालयात काम करणाऱ्या डॉक्टरांनी संप पुकारला होता. दरम्यान, याप्रकरणी न्यायाधीश अनिर्बान दास यांनी सोमवारी निर्णय दिला आहे.
💫राज्य सरकारला पीडितेच्या कुटुंबीयांना १७ लाखांची भरपाई देण्याचे देखील न्यायालयाने दिले निर्देश :-
भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४, ६६ आणि १०३ (१) अंतर्गत संजय रॉय दोषी आढळला आहे. या कलमांतर्गत गुन्हेगाराला जास्तीत जास्त फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा देण्याची तरतूद आहे. मात्र, न्यायाधीशांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारला पीडितेच्या कुटुंबीयांना १७ लाख रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, पीडितेच्या पालकांनी भरपाई घेण्यास नकार दिला.
0 टिप्पण्या