(
भागवतकार पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांचा धनगर टाकळी ग्रामस्थांच्या वतीने पारंपरिक पद्धतीने खारीक खोबऱ्याचा हार,घोंगडी व काठी देऊन सत्कार करण्यात आला.)
🌟हभप.चंद्रशेखर महाराज यांची किर्तनसेवा : सोहळ्यात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार🌟
(रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील २५ कर्तृत्ववानाना सन्मानित करण्यात आले. सिने अभिनेते मनोज जोशी,पंडित भगरे गुरुजी यांच्या हस्ते न्यायशास्त्र व मीमांसा क्षेत्रातील पुरस्कार स्वीकारताना न्यायरत्न राजेश्वर देशमुख घोडजकर.)
पुर्णा (दि.१४ जानेवारी २०२५) :- पुर्णा तालुक्यातील श्रीक्षेत्र धनगर टाकळी येथे श्री सद्गुरु दाजीमहाराज जन्मोत्सव व सच्चिदानंद वेध स्वाध्याय प्रतिष्ठान रौप्य महोत्सवाची सांगता आज मंगळवार दि.१४ जानेवारी रोजी हभप.चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली या सोहळ्यात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
(
पुरस्कार वितरण प्रसंगी विचार व्यक्त करताना सिने अभिनेते श्री.मनोज जोशी)
श्रीक्षेत्र टाकळीत दि.०२ जानेवारी ते १४ जानेवारी या कालावधीत हा सोहळा पार पडला काल सोमवार दि.१३ जानेवारी २०२५ रोजी भागवतभूषण ज्योतिषाचार्य पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांची श्रीमद् भागवतकथा व श्री लक्ष्मीनारायण पंचायतन पंचकुंडी यज्ञाची समाप्ती झाली. दुपारच्या सत्रात रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त प्रसिद्ध सिने अभिनेते श्री. मनोज जोशी, पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी, संस्थानाधिपती उमेशमहाराज टाकळीकर यांच्या उपस्थितीत वैदिक, समाज प्रबोधन, आरोग्य, विज्ञान, उद्योग, समाज संघटन, पत्रकारिता, न्यायदान, सनदी सेवा, शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक इत्यादी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्ती व सद्गुरुभक्तांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यात वेदमूर्ती श्रीनिधी धायगुडे (पुणे ),न्यायरत्न व मीमांसाकार राजेश्वर देशमुख घोडजकर (नांदेड), वे.शा.सं. प्रमोदशास्त्री कुलकर्णी, ह.भ.प. प्रभाकरबुवा आजेगावकार ,डॉ. श्रीकृष्ण कातनेश्वरकर, डॉ. श्रीपाद धानोरकर, डॉ. गोपाल जवादे, डॉ. सुशील राठी, लेखापरीक्षक व कर सल्लागार श्री. शंकरराव गुजराती, ज्येष्ठ संघसेवक श्री. शामराव जहागीरदार, सद्गुरुभक्त ह.पं. पाटील, उद्योजक विवेक वट्टमवार, श्रीनिवासशेठ काबरा, आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त सनदशीर अधिकारी संतोष अजमेरा, दैनिक प्रजावाणीचे संपादक श्री. शंतनुराव डोईफोडे, संपादक संतोष धारासुरकर, निवृत्त न्यायाधीश मोहनराव चौधरी, वेदमूर्ती अभिनव जोशी (हैदराबाद), वेदमूर्ती विद्यासागर देव (वाराणसी), वेदमूर्ती मनोज जोगळेकर (पुणे), वेदमूर्ती विजय सहकारी (गोवा), वल्लभ रामचंद्र मुंडले (सिंधुदुर्ग)व निखिल जोशी (जिंतूर) या २५ जणांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी विचार मांडताना सिने अभिनेते श्री. जोशी यांनी भारतीय संस्कृती मानवाला सुसंस्कृत बनविते गुरुकुलाची बहुश्रुत परंपरा येथे लाभली ; मात्र ही परंपरा संपविण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केला. मौखिक ज्ञानपरंपरेने ही संस्कृती टिकू शकली. या परंपरेचे धार्मिक व वैज्ञानिक महत्त्व पटवून देण्यासाठी सर्वांनी कार्य करण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी सत्कारमूर्तींच्या वतीने श्री. शामराव जहागीरदार, श्री. प्रमोदशास्त्री कुलकर्णी, डॉ. श्रीकृष्ण कातनेश्वरकर यांनी सत्कारास उत्तर दिले. वेदमूर्ती उमेशमहाराज टाकळीकर यांनी गुरुकुलाच्या वाटचालीची पार्श्वभूमी विशद करून अनेकांनी या कार्यात तनमनधनाने केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली सूत्रसंचालन डॉ. हरिभाऊ पाटील व आभार प्रदर्शन वेदमूर्ती यज्ञेश्वर लाटकर यांनी केले. मंगळवारी सकाळी ह.भ.प. चंद्रशेखरमहाराज देगलूरकर यांनी काल्याच्या किर्तन सेवेत संवादाचे प्रकार व महत्त्व प्रतिपादित केले. संवादातून तत्त्वबोध व्हावा. साधुसंतांनी सांगितलेल्या सन्मार्गाचं अनुसरण करावं. त्यातून मानवाचं कल्याण होईल, असा संदेश दिला. महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली......
0 टिप्पण्या