🌟महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंनी दिली मोठी माहिती🌟
महायुती सरकारच्या बहुचर्चित 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'तील अर्जांची पडताळणी केली जात आहे. सरकारच्या पडताळणीत अपात्र ठरण्याची टांगती तलवार आणि आतापर्यंत मिळालेले पैसे दंडासहित परत करावे लागण्याची भीती यामुळे अनेक महिला आतापासूनच लेखी अर्ज देऊन ‘लाडकी बहीण’ योजनेतून बाहेर पडत आहेत. आतापर्यंत 4 हजार महिलांनी माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे. आता याबाबत महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी माहिती दिली आहे.
राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केल्यानंतर महिलांचे अर्ज भरून घेतले होते. शासनाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडताळणी न करता सरसकट अर्ज भरून लाभ दिले होते. राज्यातून दोन कोटी 63 लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले. दोन कोटी 47 लाख महिला पात्र ठरल्या. त्यातील दोन कोटी 34 लाख बहिणींना विधानसभा निवडणुकीअगोदर पाच महिने दरमहा दीड हजार रुपये देण्यात आले आहे. मात्र आता लाडकी बहीण योजनेतील काही अर्जांची पडताळणी होणार आहे. पडताळणीत अपात्र ठरल्यास मिळवलेल्या लाभाची रक्कम दंडासहित वसूल करण्यात येण्याच्या भीतीने लाभार्थी महिला अर्ज मागे घेत असल्याची चर्चा रंगली आहे. पडताळणीनंतर तीन ते चार लाख महिला योजनेतून अपात्र ठरतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
💫मंत्री अदिती तटकरे यांनी दिली माहिती :-
याबाबत मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, निकषाबाहेरील तक्रारी आलेल्या अर्जांबाबत पडताळणी सुरू आहे. ज्यांच्याकडे वाहने आहेत, उत्पन्न मर्यादा जास्त आहे, इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींनी लाभ परत केला आहे. त्या लाडक्या प्रामाणिक बहिणींचे आभार. पात्र लाभाच्या पलीकडे रक्कम आल्यास बहिणीने ते परत करावे, अशी आम्ही विनंती केली. नियम बाह्य पद्धतीने अर्ज दाखल करणाऱ्या बहिणींचे पैसे परत घेतले जाणार आहे. अर्ज पडताळणीमध्ये आम्हाला बोगस अर्जाबाबत माहिती मिळेल. पिवळे व केशरी धारक लाभार्थ्यांची पडताळणी होणार नाही. इतर योजनांचा लाभ घेणाऱ्यांची पडताळणी केली जाणार आहे. सुरुवातीला जो शासन निर्णय जाहीर केलाय, त्यानुसारच याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या