🌟संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत मसुद्यात अचानक मोठे बदल करण्यात आल्याच्या कारणावरुन गदारोळ....!


🌟१० खासदार निलंबित : वक्फ बोर्डा संदर्भात जेपीसीच्या बैठकीतील प्रकार🌟

नवी दिल्ली :- वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयका संदर्भात मसुदा तयार करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत मसुद्यात अचानक मोठे बदल करण्यात आल्याच्या कारणावरुन आज मोठा राडा झाला. याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खा. अरविंद सावंत यांच्यासह १० जणांना समिती सदस्य पदावरुन निलंबित करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने सादर केलेल्या वक्फ दुरुस्ती विधेयकावर चर्चा व दुरुस्ती करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती गठीत केली आहे. आज सकाळी ११ वाजता या समितीची बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेशी संबंधित जो मसुदा तयार करण्यात आला होता, त्यामध्ये अचानक बदल करण्यात आल्याने आणि मसुद्यात प्रस्तावित केलेल्या बदलांवर संशोधन करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जात नसल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केला. यावरुन तृणमूल काँग्रेसचे खा. कल्याण बॅनर्जी आणि भाजपा खा. निशिकांत दुबे यांच्यात जोरदार वादावादी झाली. परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे पाहून १० खासदारांचे समितीच्या सदस्य पदावरून निलंबन करण्यात आले. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खा. अरविंद सावंत यांच्यासह ए. राजा, कल्याण बॅनर्जी, मोहम्मद जावेद, ए. राजा, असदुद्दीन ओवैसी, नासिर हुसेन, मोहिबुल्लाह, एम. अब्दुल्ला, अरविंद सावंत, नदीमुह हक, इम्रान मसूद या खासदारांचा समावेश आहे. या बैठकीत काश्मीरचे धार्मिक प्रमुख मीरवाइज उमर फारूक यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाचे म्हणणे मांडण्यात येणार होते. पण मीरवाईज यांना बोलावण्यापूर्वी समिती सदस्यांमध्ये वादावादी झाली. वादावादी आणि गदारोळामुळे बैठक काही काळ थांबवावी लागली. दिल्ली निवडणूक डोळ्यासमोर ठेवून संसदेत वक्फ दुरुस्ती विधेयकाचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचा भाजप आग्रह धरत आहे, असा आरोपही यावेळी विरोधकांकडून करण्यात आला आहे. पण यावेळी झालेल्या गदारोळामुळे १० विरोधी खासदारांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या गदारोळानंतर ही बैठक आता २७ जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या