🌟शाही स्नान रद्द ; दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुख्यमंत्री योगींना तासाभरात दोन फोन🌟
उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. देशासह संपूर्ण जगामध्ये महाकुंभमेळ्याची चर्चा सुरु आहे. 144 वर्षांनी आलेल्या या महाकुंभासाठी कोट्यवधी भाविक लोटले आहे. मौनी अमावस्येच्या निमित्ताने ही गर्दी वाढली होती. मौनी अमावस्येमुळे अमृत स्नानाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र महाकुंभमेळ्यामध्ये दुर्घटना झाली आहे. महाकुंभातील संगमवर असलेलं एक बॅरिअर तुटल्याने चेंगराचेंगरी झाली. या घटनेवरुन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये दोन वेळा चर्चा झाली.प्रयागराजमधील चेंगराचेंगरी झालेल्या दुर्घटनेमध्ये 17 हून अधिक भाविकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. तर या दुर्घटनेत 50 हुन अधिक भाविक जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेवर उत्तर प्रदेश सरकार तसेच केंद्र सरकारचे देखील पूर्ण लक्ष आहे. या घटनेवर केंद्रीय मंत्र्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील स्वतः लक्ष ठेवून आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाली आहे. तासभरामध्ये दोन वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवर योगी आदित्यनाथ यांच्यासोबत चर्चा केली. तसेच त्यांच्याकडून क्षणाक्षणाचे अपडेट जाणून घेतले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही मुख्यमंत्री योगी यांच्याशी चर्चा केली आहे. या संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती घेतली. त्यांनी तातडीने मदत देण्यावर भर दिला. भाजप अध्यक्ष आणि आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलून सर्व प्रकारची वैद्यकीय मदत देऊ केली. या संपूर्ण घटनेवर प्रशासनाकडून मिनिटा-मिनटाला लक्ष दिलं जात असून सर्व मदत करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
योगी आदित्यनाथ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन सर्व भाविकांना धीर धरण्याचे आवाहन केले आहे. तुम्ही ज्या गंगा मातेच्या घाटाजवळ आहात तिथे स्नान करा, संगम नाक्याकडे जाण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही सर्वांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि व्यवस्था करण्यात सहकार्य करावे. संगमच्या सर्व घाटांवर शांततेत स्नान सुरू आहे. कोणत्याही अफवांवर अजिबात लक्ष देऊ नका, असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.
💫नेमकं काय झालं ?
महाकुंभमेळ्यातील मौनी अमावस्येचे मुख्य स्नान असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास संगम किनाऱ्यावर गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याने चेंगराचेंगरी झाली. भाविक इकडेतिकडे पळू लागले. यादरम्यान अनेकजण खाली पडून जखमी झाले. संगम किनाऱ्यावर गर्दी वाढल्याने पोलीस लोकांना घाटावरुन बाजूला करत होते. त्यावेळी लोक जोरदार पळू लागले आणि स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. या घटनेनंतर तात्काळ जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मेळा पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सर्व आखाड्यांशी चर्चा सुरू आहे. अमृतस्नान शाहीस्नान रद्द करण्यात आले आहे. सर्व बॅरल ब्रिज आणि बॅरिकेड्स उघडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संगम नाक्यावर गर्दी जमू नये, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या