🌟अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅड.धर्मपाल मेश्राम यांना भारतीय जनता युवा मोर्चाकडून निवेदनाद्वारे साकडे🌟
परभणी (दि.१८ डिसेंबर २०२४) : परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसरातील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्या प्रकरणात राज्य सरकारने विशेष पथकाद्वारे सखोल चौकशी करावी या षडयंत्रणाचे सूत्रधार शोधून त्यांच्याविरुध्द देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव नागसेन पुंडगे यांनी केली.
राज्याच्या अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅड.धर्मपाल मेश्राम यांची युवा मोर्चाचे प्रदेश सचिव पुंडगे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश शेळके व दशरथ कदम यांनी भेट घेतली. या भेटीतून परभणीतील त्या घटनेबद्दल हितगुज केले. तसेच निवेदन सादर करीत या प्रकरणात संबंधित आरोपीविरुध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या षडयंत्रातील सूत्रधार शोधावेत, पोलिसी अत्याचारात प्राण गमावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटूंबियांना २० लाख रुपयांचे अर्थसहाय्य करावे, आरोपींविरोधात कठोर कारवाई व्हावी, जेणेकरुन भविष्यात महापुरुषांच्या तथा राष्ट्रीय प्रतिकांचा अवमान करण्याची हिम्मत कोणाची होणार नाही असे म्हटले.
दरम्यान १० डिसेंबर २०२४ रोजीची घटना ही अत्यंत संतापजनक आणि निंदनीय आहे. या प्रकरणात देशद्रोहाचे गुन्हे आरोपीविरुध्द दाखल व्हावेत, समाजात विद्वेष पसरवून वातावरण दुषित करणार्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली......
0 टिप्पण्या