🌟शहरातील व्यापार्यांच्या घेतल्या गाठीभेटी : विरोधीपक्ष नेते दाणे यांनी व्यापारी महासंघाबरोबर केली चर्चा🌟
परभणी (दि.१२ डिसेंबर २०२४) : परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची झालेली विटंबना व तोडफोडीची घटना दुर्देवी आहे या घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंद दरम्यान काही समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीसह जाळपोळीच्या दुर्देवी घटनाही चिंताजनक आहेत असे नमूद करीत महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज गुरुवार दि.१२ डिसेंबर रोजी परभणी शहरातील सर्व व्यापार्यांना या नुकसानीचा मावेजा मिळावा या दृष्टीने आपण विरोधी पक्षनेता या नात्याने सर्वतोपरी पाठपुरावा करु असे ठोस आश्वासन दिले.
मंगळवार आणि बुधवारच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विरोधीपक्षनेते दानवे यांनी आज गुरुवार दि.१२ डिसेंबर रोजी दुपारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन व्यापारीपेठांना भेटी दिल्या. स्टेशन रोड व विसावा कॉर्नर भागातील दगडफेकीसह जाळपोळीच्या घटनेतील व्यापार्यांच्या नुकसानीची पाहणी करीत अंदाज घेतला. त्या पाठोपाठ स्टेशन रस्त्यावरुन नारायण चाळ कॉर्नर, आर.आर. टॉवर, छत्रपती शिवाजी चौक, सुभाष रोड, शिवाजी रोड तसेच गुजरी बाजारासह गांधी पार्क व अष्टभूजा चौकातील दुकानांसह बोर्ड, काचेच्या तावदानांसह अन्य वस्तू, दुचाकी, तीनचाकी वाहनांच्या तोडफोडीसह जाळपोळीच्या घटनांची पाहणी केली. तेथून जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सूर्यकांत हाके, कार्याध्यक्ष नितीन वट्टमवार, कोषाध्यक्ष अशोक माटरा यांच्यासह अन्य पदाधिकारी व प्रतिष्ठीत व्यापार्यांबरोबर एका बैठकीद्वारे चर्चा केली. घटनाक्रम, त्यातील घडामोडी, व्यापार्यांचे नुकसान, पोलिस प्रशासनाची बघ्याची भूमिका, जिल्हा प्रशासनाची निष्क्रियता वगैरेंसह सर्वसामान्य व्यापार्यातील भितीदायक स्थितीचाही मागोवा घेतला.
मंगळवारी सायंकाळची व बुधवारी दिवसभरातील हिंसक घटना निश्चितच दुर्देवी आहेत, असे नमूद करीत दानवे यांनी सर्वसामान्य व्यापार्यांच्या नुकसानीचे पंचनामे केले जातील, त्यासाठी जिल्हा प्रशासनावर पूर्णपणे दबाव ठेवला जाईल, पाठपुरावा केला जाईल, व्यापार्यांच्या एकूण एक नुकसानीच्या नोंदी या पंचनाम्यामध्ये येतील, त्या पाठोपाठ नुकसान भरपाई म्हणून मावेजा मिळेपर्यंत सर्वतोपरि पाठपुरावा केला जाईल, असाही दिलासा दानवे यांनी दिला.
व्यापारीपेठातील गाठीभेटीनंतर दानवे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकारी, प्रभारी पोलिस अधिक्षक तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यातून चर्चा केली. यावेळी आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हाप्रमुख विशाल कदम, डॉ. विवेक नावंदर, अरविंद देशमुख, रवि पतंगे, प्रशांत ठाकूर, अनिल डहाळे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.....
0 टिप्पण्या