🌟श्री दत्तात्रय उत्सव यात्रा सर्वधर्मसमभावाची प्रतिक : मोहनपूरची सांस्कृतिक नाते जोपसणारी यात्रा....!


🌟थेट देवास्थानापर्यंत एस.टी. आणि खाजगी वाहनें पोहचतात🌟

✍️विशेष लेख : रवीन्द्रसिंग मोदी नांदेड 

त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे ऊगम पावलेल्या पवित्र गोदावरी नदीचा नाभिस्थळ म्हणून नांदेडची ओळख आहे. नांदेड शहरात प्रवेश करण्यापुर्वी गोदावरी नदी मोहनपूर (मौ. वाहेगाव) येथे अर्धचंद्राकार वळण घेते. याच वळणावर गोदावरीच्या काठावर गोदावरी तीर्थ संस्थान नावाचे धार्मिकस्थल विद्यमान आहे. याच परिसरात मल्लिकार्जून महादेवाचे एक प्राचीन देऊळ देखील आहे. या धार्मिक स्थाना बद्दल असे म्हटंले जाते की, हे देवस्थान (मठ) ब्रह्म, विष्णु आणि महेश यांच्या संयुक्त अंशाने निर्मित भगवान दत्तात्रय स्वामी देवस्थान (मठ) आहे. मागील तीन शे वर्षांपासून वरील ठिकाणी श्री दत्त भक्तिचा अखंड जागर सुरु आहे. 


श्री दत्त स्वामी आणि भक्तांमधील नाते जोडून ठेवण्यासाठी, भक्ती जागर अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने गोदावरी तीर्थ क्षेत्र मठ संस्थान मोहनपूरचे वर्तमान महंत, श्री श्रीमंहत 1008 रामभारती गुरु मारोती भारती महाराज यांच्या प्रयत्नांतून आणि मार्गदर्शनातून दरवर्षी श्री दत्त जयंती निमित्त मोहनपूरची धार्मिक यात्रा भरविली जाते. गोदा काठी पार पडणारा हा उत्सव डोळ्यांचं पारणं फेडणारा असा असतो. श्री दत्तात्रय उत्सव यात्रेची प्रसिध्दी महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि मध्यप्रदेश पर्यंत आहे. यात्रेनिमित्त ठिकठिकाणाहुन भाविकगण दर्शन घेण्यासाठी श्रध्दाभावाने येतात.

या यात्रेत सहभागी होण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकारी, स्थानीक स्वराज संस्थेचे पदाधिकारी सदस्यगण, सरपंच, पत्रकार आणि भाविक मोठे योगदान देतात. स्वतः वर्तमान महंत, श्री श्रीमंहत 1008 रामभारती गुरु मारोती भारती महाराज एक ते दीड महिना आहोरात्र परिश्रम करतात. भक्तांच्या घरी जाऊन त्यांना भेटून यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण देणारे ते जनसामान्यांचे एक मोठे संत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे यात्रा यशस्वी होते आणि हजारोंच्या संख्येत भाविकांना आनंदाच्या वातावरणात दर्शन घेता येते. जनमानसाच्या समावेशाने आणि मोहनपूर निकट परिसरातील गावा-गावातील भाविकांच्या सहकार्याने दरवर्षी यात्रेचे वैभव वाढतच चालले आहे. यंदा येत्या दि. 15 डिसेंबर, 2024 ते दि. 17 डिसेंबर, 2024 दरम्यान मोहनपूर (मौ.वाहेगाव) येथे या पारंपरिक आणि सांस्कृतिक यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मोहनपूर आणि मौजे वाहेगाव हे एकमेकात मिसळलेली दोन गावे या धर्मस्थळाचा मुख्य बळ म्हंटले पाहिजे. मुसलमान वाडी (खुपसरवाडी) येथून सरळ मार्ग मोहनपूरच्या दिशेला जातो. थेट देवास्थानापर्यंत एस.टी. आणि खाजगी वाहनें पोहचतात.

मोहनपूर देवस्थानाचे थोडक्यात इतिहास असे आहे की, तीन शे वर्षांपुर्वी उत्तर भारतातून मोहनीराज नावाच्या एका साधूचे नांदेडला आगमन झाले. प्रारंभी त्यांनी नंदीग्राम नगरी आणि नंतर विष्णुपूरी येथील काळेश्वर मंदिरात काही काळ वास्तव्य केला. पश्चात त्यांचे आणि मातापूर दत्तशिखराचे भारती महंत यांचे आध्यात्मिक भावाने संबंध दृढ झाले. मोहनीराज महाराज हे एक चमत्कारी पुरुष होते. त्यांना योग आणि सिध्दी अवगत होत्या असे म्हणतात. त्यांच्या प्रभावाची कीर्ति त्याकाळचे मोगल बादशाह औरंगजेब यांच्या पर्यंत होती.

बादशाह औरंगजेब हे योगी बाबाचे सामर्थ्य तपासण्यासाठी थेट नांदेडला आल्याचे काही दस्तावेज उपलब्ध आहेत असे रामभारती महाराज आवर्जूनपणे सांगतात. त्या दस्तावेजानुसार औरंगजेब हे जेव्हा गोदावरी नदीच्या काठी पोहचले तेव्हा मोहनपूर येथून काळेश्वर पर्यंतच्या गोदावरीच्या पाण्यावर मोहनीराज महाराज तरंगत चालून आल्याचे वर्णन नमूद आहे. एक पांढर्‍या कापडाच्या आसनावर मोहनीराज बाबा बसलेले आणि गोदावरी काठावरुन चालत-चालत औरंगजेब यांचे त्यांच्याशी संवाद झाल्याचे प्रसंग प्रमाण म्हणून प्रस्तुत केले जातात. औरंगजेब यांनी मोहनीराज यांच्या व्यक्तिमत्वाला नमस्कार करुन वाहेगाव सहित अनेक गावे महसूल अधिकार म्हणून त्यांना दिली. पुढे निजामनेही वरील आदेशाचे पालन केले. निजामाचे पंतप्रधान दिवान चंदूलाल हे देखील या स्थानावर येऊन गेल्याचे प्रसंग आहेत.

मोहनीराज बाबा यांनी मोहनपूर येथील मल्लिकार्जन देऊळातच शेवट पर्यंतचा आयुष्य घालवला. याच परिसरात त्यांची समाधी आहे. पण निसर्गाशी प्रेम करणारे सिध्द पुरुष मोहनीराज बाबा यांनी मोहनूपर वगळता गाडीपूरा नांदेड, काळेश्वर विष्णुपुरी नांदेड, सोनखेड नांदेड आणि तपोवन ठिकाण कार्ला ता. उमरी नांदेड येथे ही तपस्या केलेली आहे. वरील ठिकाणी मोहनीराज बाबाजींचे तपोस्थान आढळतात. मोहनीराज बाबा यांच्या गादीवर त्यांचे भक्त महंत 1008 रामभारती महाराज विराजमान झाले. त्यांच्यानंतर गादी परंपरा सुरु राहिली आणि क्रमशः रणछोड़ भारती, शालीग्राम भारती, दधाधारी मंहत, राम भारती, रामेश्वर भारती, केवलेश्वर भारती, बाळ भारती, गंगा भारती, मारोती भारती, संत दिगांबर भारती, संत दर्या भारती, संत निरंपण भारती, संत विठ्ठल भारती आणि महंत 1008 श्री श्री राम भारती गुरु मारोती भारती हे आसनावर सेवाव्रत झाले. वर्तमान मंहत श्री श्री रामभारती महाराज यांच्या प्रयत्नातून यात्रेचे सुरुवात करुन एक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक चळवळ पाहावयास मिळत आहे. प्रत्येक जाती-धर्माच्या साधू-संतांचा आणि भाविकांचा सहभाग यात्रेत होतो ही एक पर्वणीच म्हटंली पाहिजे.

आकाराने जरी ही यात्रा विस्तारीत नसली तरी देखील उपलब्ध संसाधनात योग्यरित्या यात्रेचे आयोजन करुन सर्व जातींधर्मांना यात्रेशी जोडण्याचे प्रामाणिक प्रयत्न श्री श्री राम भारती महाराज महंत यांच्यातर्फे केले जाते. नांदेड, लोहा, कंधार, मुखेड, अर्धापूर, मुदखेड तालुक्यातील असंख्य भक्त दोन ते तीन दिवस येथे दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. तर कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेशातून हजारों भाविक यात्रेत सहभागी होतात. एकूणच ही यात्रा सद्भावाचा एक उत्कृष्ट उदाहरण होय. तसेच सर्व जातीधर्मांना जोडणारा एक उत्सव होय.

- स. रवीन्द्रसिंघ मोदी (पत्रकार) - नांदेड 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या